वडोदरा : दीर्घकाळापासून टीम इंडियातून बाहेर असणारा ऑलराऊंडर क्रिकेटर इरफान पठाण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा निकाह पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. इरफानची भावी वधू कोण असेल? याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. पण, आता मात्र याबाबतचा खुलासा झालाय.
इरफान सफा हिच्याशी विवाह करणार आहे. या लग्नासाठी इरफानच्या कुटुंबाची खरेदीही पार पडलीय.
सफाशी विवाह करण्याचा निर्णय घेण्याअगोदर इरफान पठाण ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या शिवांगी हिच्या प्रेमात पडला होता. शिवांगीचे वडील ऑस्ट्रेलियातील कॅनबरामध्ये भारतीय राजनैतिक आहेत. पण, या दोघांचं नातं २०१२-१३ दरम्यान संपुष्टात आलं.
इरफान आणि शिवांगीची पहिली भेट २००३ मध्ये एडिलेडमध्ये झाली होती. त्यानंतर इरफानसाठी शिवांगी भारतातही आली होती. तीन वर्ष ती वडोदरामध्ये राहत होती.
मात्र, इरफान-शिवांगीच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. हळूहळू हा विरोध मावळला. पण, २०१२ नंतर मात्र या दोघांत दुरावा वाढला. कारण होतं... इरफानचा एक हट्ट... आपला मोठा भाऊ युसुफ पठाण याचं अगोदर लग्न व्हावं, अशी इरफानची इच्छा होती. परंतु, शिवांगीला मात्र लग्नासाठी उशीर करायचा नव्हता. दोघंही आपापल्या हट्टांवर कायम राहिले... आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला... हे नातं तुटलं!