नवी दिल्ली : पी. व्ही. सिंधूचा सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने धडक मारली.
सिंधूने 16-21 आणि 20-22 असा सरळ दोन सेटमध्ये सायनावर विजय मिळवून उपांत्यफेरीत प्रवेश केला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये देशाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या भारताच्या या दोन्ही अव्वल बॅडमिंटनपटू इंडियन ओपनच्या निमित्ताने परस्परांसमोर खेळल्या. यात कोण बाजी मारतो याकडे लक्ष्य लागले होते. प्रेक्षकांनाही या लढतीची प्रचंड उत्सुक्ता होती.
पहिल्या सेटमध्ये सायना निष्प्रभ ठरली. पण दुसऱ्या सेटमध्ये खेळ उंचावत तिने चांगला प्रतिकार केला. दुसरा सेट सायना जिंकेल असे वाटत असतानाच शेवटच्या क्षणी तिने काही चुका केल्या आणि त्याचा फायदा उचलत सिंधूने तिच्यावर दोन गुणांच्या फरकाने मात केली.
सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर, सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा धुव्वा उडवून तर सिंधूने जपानच्या साएना कावाकामीचे कडवे आव्हान परतवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.