मुंबई : एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारताची पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला आहे. पण या स्पर्धेमध्ये भारताच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
आयसीसी बीसीसीआयला देण्यात येणारा महसुलातील हिस्सा कमी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे बीसीसीआय नाराज असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयच्या दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये आयसीसीच्या या निर्णयाला कठोर विरोध करण्याची भूमिका घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांना आयसीसीकडून महसुलातील सर्वाधिक हिस्सा मिळतो. तसंच या तिन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाला कोणताही निर्णय घेताना महत्त्व दिलं जातं. आयसीसीनं जर या निर्णयात बदल केला तर या तिन्ही बोर्डांचे पंख कापले जाणार आहेत. यामुळे बीसीसीआयनं आक्रमक भूमिका घेतली आहे.