कोलकता : पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील एका गावामधील मुलींचा फुटबॉल सामनाच रद्द करावा लागला. फुटबॉलपटूंच्या 'घट्ट' पोशाखाला मौलवींनी केलेल्या विरोधामुळे हा सामना रद्द झाला, यावर क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महिलांमधील फुटबॉलची लोकप्रियता वाढावी, या हेतूने हरिश्चंद्रपूरमधील प्रोग्रेसिव्ह युथ क्लबचे अध्यक्ष रेझा राझी यांच्यासह काही जणांनी मुलींच्या माध्यमिक शाळेच्या मैदानावर मुलींच्या संघांमध्ये १४ मार्च रोजी प्रदर्शनीय सामना आयोजित केला होता.
मात्र, गावातील मौलवी आणि काही नागरिकांनी अचानक या सामन्याला विरोध करण्याची भूमिका घेतली. 'स्थानिक महिला आणि मुलींवर या सामन्याचा विपरित परिणाम होईल,'असा दावा विरोधकांनी केला. यापैकी काहींनी खेळाडूंच्या पोशाखावरही आक्षेप घेतला, अशी माहिती राझी यांनी दिली.
राझी म्हणाले, "या सामन्यास आक्षेप घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करण्याचे आम्ही प्रयत्न केले. मी स्वत:ही एक मुसलमान आहे आणि रोज नमाज पडतो. गावामध्ये महिलांचा फुटबॉल सामना आयोजित करण्यात चुकीचे काय आहे?'या सामन्याचे सुरळीत आयोजन करण्यासाठी आयोजकांनी स्थानिक प्रशासनाकडेही मदत मागितली.
मात्र, प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत परवानगी नाकारली. "मौलवींच्या दडपणाखाली प्रशासन झुकले. त्यामुळे आमच्यासमोर पर्यायच उरला नाही,'असे राझी म्हणाले. मालडा जिल्हा क्रीडा संघटनेचे आम्ही सदस्य असून या घटनेसंदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.