धोनीचा सल्ला माझ्यासाठी लाखमोलाचा - कोहली

वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदा पत्रकार परिषदेत बोलला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्या इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे खेळणार आहे. 

Updated: Jan 14, 2017, 01:46 PM IST
धोनीचा सल्ला माझ्यासाठी लाखमोलाचा - कोहली title=

पुणे : वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदा पत्रकार परिषदेत बोलला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्या इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे खेळणार आहे. 

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने धोनीचे तोंडभरुन कौतुक केले. धोनीचा सल्ला माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. वनडे आणि टी-२०मधील नेतृत्वाची पद्धत माझी असली तरी धोनीचा सल्ला माझ्यासाठी मोलाचा आहे. डीआरएसपेक्षाही माझा धोनीवर अधिक विश्वास आहे, अशा शब्दात त्याने धोनीचे कौतुक केले. 

आता क्रिकेटपटू म्हणून धोनी आपल्या फलंदाजीत विविध प्रयोग करु शकतो. युवराज सिंग आणि धोनीमुळे मधली फळी अधिक मजबूत झालीये, असंही विराट पुढे म्हणाला. याआधी काल धोनीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराटची स्तुती केली होती.  

धोनीनंतर नेतृत्व करण्याबाबत काय म्हणाला विराट

विराट पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, प्रत्येकाची नेतृत्वाची पद्धत वेगळी असते. मात्र एक गोष्ट कायम असते ती म्हणजे धावा करणे, विकेट घेणे आणि प्रत्येक सामना जिंकणे. मी आणि धोनी एकमेकांच्या खेळाविषयी जाणतो त्यामुळे तितक्या समस्या येणार नाहीत. धोनी जेव्हा नेतृत्व करत होता तेव्हा मीही सल्ला द्यायचे. जेव्हा धोनीला वाटायचे तेव्हा तो माझा सल्ला अंमलात आणत असे. आता मी नेतृत्व करणार आहे. माझे नेतृत्व करण्याची पद्धत वेगळी असेल मात्र धोनीचा सल्ला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. 

धोनीच्या बॅटिंगबाबत
कोहली म्हणाला, मला विश्वास आहे की धोनीवर आता कोणतेही दडपण असणार नाही. आता एक फलंदाज म्हणून तो स्वत:ला एक्सप्रेस करु शकोत. आपल्या फलंदाजीत नवनवे प्रयोग करण्याची संधी त्याला आहे. 

युवराजचे पुनरागमन
युवराजच्या पुनरागमनवरही विराट पत्रकार परिषदेत बोलला. आता धोनीवर तितकासा दबाव येणार नाही. कारण आधी जेव्हा सुरुवातीच्या फळीने चांगली कामगिरी केली नाही तर धोनीवर दबाव यायचा. यासाठीच युवराजला संघात घेतले गेले. रायडूबाबतही विचार सुरु होता मात्र तो दुखापतग्रस्त आहे. दुसरीकडे युवराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीये. त्यामुळे संघाला युवराज आणि धोनीच्या रुपात मधल्या फळीत चांगले फलंदाज मिळालेत.