नवी दिल्ली : डीडीसीए म्हणजेच दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं माजी क्रिकेटपटू अतुल वासन, निखील चोप्रा आणि मणिंदर सिंग यांना दिल्लीच्या निवड समिती सदस्य पदावरून काढून टाकलं आहे. लोढा समितीच्या शिफारसींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
हे क्रिकेटपटू सभासद आणि निवड समितीचे सदस्य असल्यामुळे त्यांना डच्चू देण्यात आल्याची प्रतिक्रिया डीडीसीएचे सभासद दिनेश शर्मा यांनी दिली आहे. हितसंबंध गुंतलेले असलेल्यांना एकाच वेळी दोन भूमिका बजावता येणार नाहीत. जर निवड समितीचा सदस्य क्रिकेट अॅकेडमी चालवत असेल तर त्याला क्रिकेट असोसिएशनचं सभासद होता येणार नाही अशी शिफारस लोढा समितीनं केली आहे. बीसीसीआयनंही लोढा समितीच्या 70 टक्के शिफारसी मान्य केल्या आहेत. यामुळे डीडीसीएनं हा निर्णय घेतल्याचं शर्मा म्हणाले आहेत.
वासन, निखील चोप्रा आणि मणिंदर सिंग यांचे मीडियाबरोबर करार झाले आहेत. या हितसंबंधांचं कारण देत डीडीसीएनं या तिघांना महिन्याभरापूर्वी नोटीस पाठवली होती. या तिघांनीही या नोटिसला उत्तर न दिल्यानं अखेर डीडीसीएच्या बॉर्ड ऑफ डायरेक्टर्सनी तिघांनाही डच्चू देण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य दिनेश शर्मांनी केलं आहे.