अमेरिकन चॅम्पियनशीप : दत्तू भोकनळची ‘सुवर्ण' कामगिरी

भारताचा रोइंगपटू दत्तू भोकनळने आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'यूएसए चॅम्पियनशीप' स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. कठिण परिस्थितीशी झगडून दत्तूनं मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल.

Updated: Jul 19, 2016, 05:40 PM IST
अमेरिकन चॅम्पियनशीप : दत्तू भोकनळची ‘सुवर्ण' कामगिरी  title=

वॉशिंग्टन : भारताचा रोइंगपटू दत्तू भोकनळने आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'यूएसए चॅम्पियनशीप' स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. कठिण परिस्थितीशी झगडून दत्तूनं मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल.

दत्तू हा चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील रहिवासी असून तो लष्करात जवान म्हणूनही कार्यरत आहे. भारतातर्फे रिओ ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली आहे. त्याचाच सराव म्हणून दत्तूने या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण २० देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. अंतिम फेरीत अन्य सहा खेळाडूंवर मात करत दत्तूने हा विजय साकारला. २०१५ साली बीजिंग येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्याने रौप्य पदकाची कमाई केली होती.

अडचणी थांबवू शकणार नाहीत

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे दत्तूला अमेरिकेतील हॉटेल सोडावे लागले होते. तेथील खर्च त्याला पेलवत नसल्याने तो सध्या तिथंच एका भारतीय गुजराथी कुटुंबाकडे पेर्इंग गेस्ट म्हणून वास्तव्यास आहे. 

रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दत्तूनं राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली होती. सरकारने आधी मदत करण्यास नकार दिला परंतु, झी २४ तासच्या पाठपुराव्यानंतर सरकारकडून दत्तूला ५ लाखांची मदत मिळालीय. दत्तू भोकनळ भारताचा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे.