मुंबई : सध्या सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. रिओच नाही तर भारताचा एकूण ऑलिम्पिक इतिहास पाहता भारत हा क्रिडाक्षेत्रातील अतिशय मागास देश म्हणता येईल.
भारतात क्रिकेटला नको इतकं महत्त्व दिलं जातं. क्रिकेटच्या नावाने राजकारणही केलं जातं. अगदी शालेय स्तरावरच्या छोट्याशा विक्रमालाही विश्वविक्रमाएवढं महत्त्व दिलं जातं. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना भारतीयांसाठी इज्जतीचा प्रश्न असतो.
पण इतर खेळांबाबत मात्र भारतात कमालीची उदासीनता दिसून येते. ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदकं मिळवली याचं सर्वसामान्य भारतीयांना सोयरसुतकही नसतं. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असूनही ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचायला भारताला ३६ वर्षे लागली.
असं का होतं ? यावर काय उपाययोजना करता येईल ? याविषयी भारतात अजूनही विचार होत नसला तरी या अधोगतीची खरी कारणं चीनी प्रसारमाध्यमांनी शोधून काढली आहेत.
१) खेळासाठी सोयीसुविधायुक्त जागेचा अभाव
२) अनारोग्य
३) गरीबी
४) मुलींना खेळण्यासाठी पुरेसा पाठिंबा मिळत नाही
५) मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर क्षेत्रात ढकललं जातं
६) क्रिकेटची अमर्याद लोकप्रियता
७) हॉकीची लयास गेलेली लोकप्रियता
८) ग्रामीण भागात असणारे ऑलिम्पिकबाबतचे अज्ञान
एका चीनी वेबसाईटवरील लेखात भारतीय संस्कृतीला दोष देण्यात आला आहे. "भारतीय कुंटुंबातील मुलांवर डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्यासाठी दबाव टाकला जातो. क्रिडागुणांना महत्त्व दिलं जात नाही असं या लेखात म्हटलं आहे".
आणखी एका वेबसाईटवरील लेखात क्रिकेटला दोष देण्यात आला आहे. "क्रिकेट हाच भारतीयांचा धर्म आहे. क्रिकेट न आवडणाऱ्या व्यक्तीला इथे कमी लेखलं जातं. त्यामुळे भारतीय तरूण इतर खेळ खेळण्यास धजावत नाहीत" असं यात म्हटलं आहे.