मुंबईतील झोपडपट्टीतील मुलांची कमाल, देशाला मिळवून दिले गोल्ड मेडल

चार बॉक्सर खेळाडू ते मालवणीमधील झोपडपट्टीत राहतात. यातील काहींचे वडील रिक्षा चालवतात तर काहींची आई घरकाम आणि ट्रेनमध्ये छोट्या वस्तू विकते. मात्र अशा परिस्थितीवरही मात करत या मुलांनी चेस बॉक्सिंगमध्ये भारताला गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई करून दिली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2017, 11:40 PM IST
मुंबईतील झोपडपट्टीतील मुलांची कमाल, देशाला मिळवून दिले गोल्ड मेडल title=

मेघा कुचिक, मुंबई : चार बॉक्सर खेळाडू ते मालवणीमधील झोपडपट्टीत राहतात. यातील काहींचे वडील रिक्षा चालवतात तर काहींची आई घरकाम आणि ट्रेनमध्ये छोट्या वस्तू विकते. मात्र अशा परिस्थितीवरही मात करत या मुलांनी चेस बॉक्सिंगमध्ये भारताला गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई करून दिली आहे. 

मालवणी भागातील आझमीनगर. येथील चार हिरे. ही मूलं याच झोपडपट्टीत राहतात. इथंच यांचं बालपण गेलं. इथंच त्यांनी काहीतरी बनून दाखवण्याची इच्छा बाळगली आणि याच झोपडपट्टीत मेहनत घेऊन त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. या चारही मुलांनी नुकत्याच कोलकात्यात पार पडलेल्या चेस बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई करून दिलीय.

चेस बॉक्सिंग म्हणजे दोन राऊंड बॉक्सिंग आणि तीन राऊंड बुद्धिबळचे. यात हर्षिद शेखनं 45 किलो वजनी गटात तर शिवरतन गुप्ताने 40 किलो वजनी गटात गोल्ड मेडलला गवसणी घातली. याखेरीज केतन सैनीने 42 किलो वजनी गट आणि अरबाज सैय्यदने 64 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल पटकावलं.

या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. कोणाचे वडील रिक्षा चावतात तर कोणाची आई घरकाम करते तर कोणाची आई ट्रेनमध्ये सामान विकते. खरंतर घरातून कोणताही पाठींबा या मुलांना नाही तरीही त्यांनी देशाची मन उंचावेल अशी कामगिरी केली.

आपला मुलगा नक्की काय खेळतो हे जरी यांच्या पालकांना माहीत नसलं तरी आपल्या मुलानं देशाची मान उंचावल्याचा आनंद यांच्या पालकांना आहे. कोच संतोष धायगोंडे यांचं प्रशिक्षण आणि सेंट मॅथू हाय स्कूलच्या मुख्याध्यापिका लारझी वर्गीस यांच्या मदतीमुळेच ही मुल इथंवर पोहोचू शकली.

कोणतीही अत्याधुनिक सुविधा नसताना घरात अठराविश्व दारिद्र्य असताना या मुलांनी इराण, रशिया, फ्रान्स आणि इटली या देशातील बॉक्सर्सचं आव्हान मोडीत काढत हे यश मिळवलं हे विशेष.