तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली

ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. 

Updated: Dec 30, 2014, 01:44 PM IST
तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली title=

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. 

दुसऱ्या डावात विराट कोहली ( ५४) आणि अजिंक्य रहाणे (४८) यांनी चांगली खेळी करत भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला खरा मात्र इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्यानं ही टेस्ट ड्रॉ राहिली. ऑस्ट्रेलियातर्फे जॉन्सन, हॅरिस आणि हेझलवूडनं प्रत्येकी २ बळी टिपले. 

पहिले दोन कसोटी सामने जिंकत ऑस्ट्रेलियानं मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. तिसरा सामना जिंकून मालिकेत आव्हान कायम राखण्याची संधी भारताकडे होती, मात्र त्यांनी ती गमावली. ऑस्ट्रेलियाच्या ३८४ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीचे फलंदाज  विजय (११), शिखर धवन (०) , के.एल.राहुल (१ ) पटापट तंबूत परतले. त्यानंतर कोहलीनं रहाणेच्या साथीनं चांगला खेळ केला. मात्र ते दोघं बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी मंदावली. भरवशाचा पुजाराही २१ धावांवर बाद झाल्यानं भारताच्या विजयाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. 

पाचव्या दिवसाचा खेळ संपायला अवघा काही वेळ उरलेला असताना कर्णधार धोनी (नाबाद २४) फलंदाजीस आला, मात्र तो भारताला विजयाच्या समीप नेऊ शकला नाही. अखेर खेळ संपताना भारतानं ६ गडी गमावत १७४ केल्या आणि टेस्ट ड्रॉ राहिली.

शॉन मार्श (९९) आणि रॉजर्सच्या (६९) खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी ३८४ धावांचं आव्हान ठेवलं. तळाच्या फलंदाजांची चिवट खेळी आणि भारतीय गोलंदाजांचे अपयश यामुळं ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही मोठी धावसंख्या उभारली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.