www.24taas.com , नवी दिल्ली
कुठल्या न कुठल्या तरी वादावरून नेहमी चर्चेत राहणारा बिग बॉस हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा नव्या वादात अडकलाय. ‘बिग बॉस – ६’ या कार्यक्रमाच्या जाहिरातीवरून कलर्स चॅनलवर एका आठवड्याच्या आत कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला दिलेत.
बिग बॉस-६ची लोकप्रियता वाढवण्यासाठी सिनेमागृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी बिग बॉसचा आवाज ऐकू येतो ‘बिग बॉस चाहते की आप राष्ट्रिय गान के लिए खडे हो’ आणि राष्ट्रगीत चालू असताना कलर्स चॅनेलचा लोगो स्क्रिनवर दाखवण्यात येतो. हा बीग बॉसच्या जाहिरातीचा एक भाग आहे. आजकाल असा आवाज रेल्वे स्टेशन, तिकीट खिडक्यांच्या जवळही ऐकायला मिळतो. पण, याच आवाजानं बीग बॉसच्या समोर आता अडचणी निर्माण केल्यात. आपल्या चॅनलची जाहिरात करण्यासाठी राष्ट्रगीताचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करत जितेंदर गुप्ता नावाच्या एका वकिलाने कलर्स चॅनलविरोधात उच्च न्यायालयात तक्रार दाखल केलीय.
राष्ट्रगीतचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणं, हा कायद्याने गुन्हा आहे असा दावा अॅड. गुप्ता यांनी केलाय. अॅड. जितेंदर गुप्ता यांनी केलेली तक्रार जनहित याचिका मानून आणि तक्रारीची योग्य ती पडताळणी करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. डी. मुरूगेसन आणि न्यायमूर्ती राजीव सहाय यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं हे आदेश दिलेत.