मराठी मालिकांचा 'झोका' अंधारात!

गोरेगाव फिल्मसिटीत मराठी मालिकांच्या चित्रिकरणासाठी दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद करण्यात आली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 1, 2013, 03:58 PM IST

www.24taas.com, गोरेगाव
गोरेगाव फिल्मसिटीत मराठी मालिकांच्या चित्रिकरणासाठी दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या चित्रीकरण सुरु असलेल्या ‘उंच माझा झोका’ आणि ‘राधा ही बावरी’ या दोन्ही मालिकांच्या चित्रीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
१ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१२ या एक वर्षाच्या कालावधीत सरकारनं मराठी मालिकांच्या चित्रिकरणासाठी ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. ज्याची मुदत आता संपली असून आता मात्र मराठी मालिकांच्या चित्रीकरणासाठी हिंदी मालिकांसारखंच भाडं स्विकारण्यात येणार आहे. ही सवलत कायम स्वरुपी असावी तसंच फक्त आपल्याच निर्मितीला नाही तर सगळ्याच मराठी मालिकांसाठी ही सवलत मिळावी, अशी मागणी निर्माता विरेन प्रधानने केली होती. या मागणीला मनसे आणि शिवसेना या दोन्ही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.

मात्र, अद्यापही सरकारकडून याचं काहीही उत्तर आलेलं नाही. यावर सरकारने आपली भूमिका लवकरात लवकर मांडली नाही तर शिवसेना आणि मनसे दोन्हीही पक्षाच्या चित्रपट सेनेच्या अध्यक्षांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय.
एकूणच पुन्हा एकदा या मराठी मालिकांचं भवितव्य धोक्यात आलंय. आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.