www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छोट्या पडद्यावरचा मानाचा समजला जाणारा झी मराठी अवॉर्ड्स सोहळा नुकताच पार पडलाय. या सोहळ्यावर मोहोर उमटवली ती होणार सून मी ह्या घरची या मालिकेनं. सर्वोत्कृष्ट नायक शशांक केतकर, सर्वोत्कृष्ट नायिका तेजश्री प्रधान तर सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कारही श्री-जान्हवी या जोडीला मिळाला.. यासोबतच एकूण ११ पुरस्कार या मालिकेनं मिळवलं...
मृणाल दुसानिसनं सर्वोत्कृष्ट सून कॅटेगरीचा पुरस्कार मिळवला.. तर सर्वोकृष्ट सासऱ्याचा पुरस्कार शरद पोंक्षेंनी ‘राधा ही बावरी’ मालिकेतील आपल्या भूमिकेसाठी पटकावला. सन्मान म्हणून सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा कॅटेगरीत कविता लाड आणि चिन्मय मांडलेकर यांनी बाजी मारली. तर सहाय्यक व्यक्तिरेखेचा पुरस्कार दिप्ती केतकर आणि अतुल परचुरे यांनी पटकावला.
विनोदी व्यक्तिरेखा कॅटेगरीतील पुरस्कार लिना भागवत, बी. एल. पाठक अर्थात वैभव मांगले आणि आनंद इंगळे यांना मिळाला. विशेष लक्षवेधी चेहरा म्हणून श्रृती मराठेची निवड झाली तर सर्वोत्कृष्ट परिक्षकाचा पुरस्कार स्वप्नील जोशीला मिळाला.. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालनात आदेश बांदेकरनं तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकत यावेळी हॅट्रीक केली.
यंदाचं झी मराठी पुरस्कार सोहळ्याचं १०वं वर्ष असल्यानं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सोहळा पार पडला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.