सचिन तेंडुलकर विरुद्ध शिवसेना... जुनं नातं!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विक्रम हे नातं एकदम घट्ट आहे... फेविकॉलच्या मजबुत जोडसारखंच... अगदी त्याचप्रमाणं सचिन तेंडुलकर विरूद्ध शिवसेना हे समीकरणही गेल्या काही वर्षांत घट्ट रूजलंय. अगदी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या निमित्तानं या वादालाही नवे धुमारे फुटलेत...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 23, 2013, 07:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विक्रम हे नातं एकदम घट्ट आहे... फेविकॉलच्या मजबुत जोडसारखंच... अगदी त्याचप्रमाणं सचिन तेंडुलकर विरूद्ध शिवसेना हे समीकरणही गेल्या काही वर्षांत घट्ट रूजलंय. अगदी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या निमित्तानं या वादालाही नवे धुमारे फुटलेत...

क्रिकेटच्या कारकीर्दीला अलविदा करणाऱ्या सचिन तेंडुलकरचं नाव कांदिवलीच्या नव्या क्रीडा संकुलाला देण्याची घोषणा एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पवारांची ही घोषणा म्हणजे त्यांच्या खास स्टाइलमधला `दुसरा`च आहे. एकाच चेंडूमध्ये त्यांनी सचिनचा गौरवही केलाय आणि त्याच चेंडूवर शिवसेनेची विकेट जाईल, याची फिल्डिंगही लावलीय. अपेक्षेप्रमाणे कांदिवली क्रीडा संकुलाचं ‘सचिन तेंडुलकर अकादमी’ असं नामकरण करण्यास शिवसेनेने विरोध केला. ही जागा महापालिकेची असल्यानं नामकरणाचा अधिकार महापालिकेचाच आहे, अशी भूमिका पालिकेतील शिवसेना सभागृह नेते यशोधर फणसे यांनी मांडली. दरम्यान, एमसीएच्या वतीनं आता अधिकृतपणे नामांतराची विनंती करणारं पत्र महापौरांना पाठवण्यात आलंय. हे पत्र गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येईल, असं महापौर सुनील प्रभूंनी स्पष्ट केलंय.
विशेष म्हणजे कांदिवलीच्या क्रीडा संकुलाला ख्यातनाम क्रिकेटपटू सुनील गावस्करांचं नाव द्यावं, असं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव व ‘न्यू हिंदू क्रिकेट क्लब’चे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी २९ मे २०१३ रोजी एमसीएला पाठवलं होतं. त्यानंतर हे क्रीडा संकुलच बेकायदेशीर असल्याचा आरोप करत शिवसेनेच्यावतीनं ‘एमसीए’वर धडक मोर्चाही काढण्यात आला होता. आता सचिनच्या नावाला आमचा विरोध नाही, असं शिवसेना नेते सांगत असले तरी तेंडुलकर विरूद्ध शिवसेना हा वाद काही आजच जन्माला आलेला नाही.

‘श्वास’ या मराठी चित्रपटाला ऑस्करवारीसाठी थेट आर्थिक मदत देण्याऐवजी सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटचा लिलाव करण्याची सूचना केली होती. हा धागा पकडून `आमच्याकडेही एखादी बॅट असती तर आम्हीही दिली असती...` असा मार्मिक टोला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सचिनला लगावला होता. मुंबई सर्वांचीच आहे, असं वक्तव्य मध्यंतरी तेंडुलकरनं केल्यानं शिवसेनेनं त्याच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या वतीनं जाहीर नागरी सत्कारासाठी सचिनला जवळपास १५ पत्रं पाठवण्यात आली. मात्र, सचिननं तो सत्कार स्वीकारला नाही. याउलट मनसेच्यावतीनं आयोजित सत्काराला मात्र सचिन आवर्जून उपस्थित राहिला. ओसी नसताना वांद्र्यातील आपल्या नव्या बंगल्यात गृहप्रवेश करणाऱ्या तेंडुलकरला महापालिकेनं दंडही ठोठावला होता.
त्यामुळे शिवसेना विरूद्ध तेंडुलकर हे जुनं वैर कांदिवली क्रीडा संकुलाच्या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसतंय... निवृत्त होणाऱ्या सचिन तेंडुलकरबद्दल आपुलकीची भावना देशभरात असताना, त्याच्या नावाला सेनेचा विरोध असल्याचं चित्र निर्माण करून शरद पवारांनी शिवसेनेची `विकेट` आपसूक काढलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.