www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वानखेडेवर अखेरची २०० वी टेस्ट मॅच खेळणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दिवसअखेर ३८ धावांवर नाबाद खेळतोय. सचिनने कारकिर्दीतील शेवटच्या इनिंगमध्येही `सेंच्युरी`कर व्हावे, अशीच तमाम क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. त्यामुळेच सचिनच्या या खेळीकडे आता जगाच्या नजरा खिळल्यात.
कधी नव्हे ते चक्क भारताच्या पहिल्या दोन विकेट लवकर पडाव्यात, म्हणून करोडो क्रिकेट रसिक आज डोळे लावून बसले होते. कारण क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकर कधी एकदा बॅटिंगला येतोय, असं त्यांना झालं होतं आणि ज्या क्षणाची लाखो फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला... मुरली विजय आऊट झाला आणि स्टेडियममध्ये एकच जयघोष घुमू लागला... सच्चिन सच्चिन... सच्चिन सच्चिन... पॅव्हेलियनमधून मैदानाच्या दिशेने पडणाऱ्या सचिनच्या प्रत्येक पावलागणिक, फॅन्सच्या मुखातून होणारा सचिन नामाचा गजर इतका टिपेला भिडला की आकाशात तळपणाऱ्या सूर्यनारायणालाही पृथ्वीवर काय चाललंय, हे पाहण्याकरता डोकवावं लागलं.
वानखेडे स्टेडियममध्ये आपली अखेरची टेस्ट खेळण्याकरता उतरलेल्या सचिन तेंडुलकरने मैदानात पाऊल टाकल्यानंतर नेहमीप्रमाणं सर्वप्रथम आकाशाकडे पाहिलं. आपल्या लाडक्या बाबांची आठवण काढत त्यांना अभिवादन केलं. पीचपर्यंत पोहोचण्याआधी या विक्रमादित्याच्या स्वागताकरता प्रतिस्पर्धी वेस्ट इंडीज टीम आदराने उभी राहिली. त्यावेळी स्टेडियममध्ये केवळ आणि केवळ सचिननामाचाच गजर सुरू होता. आतापर्यंत २२ यार्डच्या या होमपीचवर खोऱ्याने रन्स काढणाऱ्या मास्टर ब्लास्टरने वानखेडेच्या पीचचा आशिर्वाद घेतला. तेव्हा सर्वांचाच उर अभिमानाने भरून आला. विंडीजच्या शिलींगफोर्डच्या पहिल्या बॉलचा आत्मविश्वासाने सामना केल्यानंतर सचिननेही आपली ही अखेरची टेस्ट एन्जॉय करण्याचा इरादा पक्का केला आणि पुन्हा तोच जुना सचिन फॅन्सना मैदानात पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून एखादा शॉट निघण्याचा अवकाश... फॅन्स त्या शॉटला उत्स्फूर्त दाद देत होते. सच्चिन, सच्चिन नावाचा जयघोष सुरूच होता... स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, लेग ग्लान्स अशी एक ना अनेक भात्यातली अस्त्रं काढणाऱ्या सचिनने विंडिजच्या बॉलर्सची पिसं काढायला सुरूवात केली. सचिनची विकेट काढण्याचे त्यांचे सगळे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. सहा शानदार चौकारांसह ३८ धावा करून सचिन पहिल्या दिवसअखेरीस नाबाद राहिला.
त्याची ही आत्मविश्वासपूर्ण खेळी पाहून आता फॅन्सना स्वप्न पडायला लागली. ती १०१ व्या आंतरराष्ट्रीय सेंच्युरीची... आणखी एक अविस्मरणीय खेळी पेश करून सचिनने आपल्या २४ वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट करिअरची शानदार अखेर करावी, हीच आता तमाम फॅन्सची इच्छा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.