राज ठाकरेंनी आझमींना खडसावले

दुष्काळाच्या मुद्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात टोला प्रतिटोल्याचे राजकारण सुरू आहे. राज ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्यावर तोंडसुख घेतले तर अबू आझमी हे बाहेरच्या राज्यातून आलेला लाचार असल्याचा प्रतिटोला राज ठाकरे यांनी लगावला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 6, 2013, 05:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दुष्काळाच्या मुद्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात टोला प्रतिटोल्याचे राजकारण सुरू आहे. राज ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्यावर तोंडसुख घेतले तर अबू आझमी हे बाहेरच्या राज्यातून आलेला लाचार असल्याचा प्रतिटोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे दुष्काळाचं राजकारण करीत आहे. एक दोन टँकर दिल्यानं दुष्काळ हटत नाही, टीव्हीवर येऊन ओरडल्यानेही दुष्काळ हटणार नाही. ताहनलेल्याला पाणी देणे महत्त्वाचे आहे, असा टोला अबू आझमी यांनी राज ठाकरेंना लगावला होता. महाराष्ट्रातील सरकारसोबत बसून या संदर्भात सर्व पक्षांनी रणनिती बनवायला हवी, तरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही आझमी यांनी म्हटले होते.
आझमींच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत प्रत्युत्तर दिलंय. कोणाच्या वक्तव्यावर बोलायचे हेही आपण पाहिले पाहिजे. हे बाहेरच्या राज्यातून आलेली लाचार माणसं आहेत. यांच्याकडे आयुष्यभराचा दुष्काळ पडलेला आहे, म्हणून ती माणसं महाराष्ट्रात पोटं भरायला आलीत, त्यांनी दुष्काळाबद्दल बोलूच नये, अशा शब्दात राज यांनी अबू आझमी यांना चांगलेच सुनावले आहे.

राज ठाकरे यांनी राज्यात मनसेकडून उभारण्यात आलेल्या चारा छावण्या पाहणीच्या दौरा सुरू आहे. राज ठाकरे महाराष्ट्र दौर्‍यावर असताना कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना दुष्काळग्रस्तांना मदत करा, पक्षाकडून लागेल ती मदत केली जाईल असे आदेश दिले होते.