राज ठाकरे कोकणात, भराडीदेवीचे घेतले दर्शन

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील सुप्रसिद्ध भराडीदेवीच्या मंदिरात जाऊन सपत्नीक भराडीदेवीचं दर्शन घेतलं.

Updated: Feb 14, 2013, 02:28 PM IST

www.24taas.com, आंगणेवाडी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र व्यापी दौऱ्याला कोल्हापूरमधून सुरवात झाली. तेव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीमातेचे दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या दौऱ्याला सुरवात केली. तर आता राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील सुप्रसिद्ध भराडीदेवीच्या मंदिरात जाऊन सपत्नीक भराडीदेवीचं दर्शन घेतलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबई ठाणे आणि परिसरातून लाखो भाविक आंगणेवाडीत दाखल झाले आहेत. या जत्रेनिमित्तच राज ठाकरे यांनी भराडीदेवीचं दर्शन घेतलं. भराडी देवी नवसाला पावते, अशी अनेकांची भावना असल्याने या जत्रेला लाखोंची गर्दी होते.

पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. दर्शनाची रांग जवळपास एक किलोमिटर लांब असल्याचं सांगण्यात येतं आहे. गेल्या काही वर्षांत आंगणेवाडीत राजकीय नेत्यांचा सहभाग वाढू लागला आहे. यंदाही अनेक दिग्गज यात्रेला येणार आहे. भाविकांनी आंगणेवाडीचा परिसर फुलून गेला आहे.