अरूण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे
पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही शहरातली पाणीकपात कायम आहे. त्याचवेळी जिल्ह्यातल्या शेतीला पाणी सोडण्यात येतंय. याच्याच निषेधार्थ मनसेनं पुण्यातल्या सिंचन भवनासमोर निदर्शनं केली. पाण्याच्या नियोजनासंदर्भात बोलावण्यात आलेल्या कालवा समितीच्या बैठकीला पुणे शहरातला एकही आमदार उपस्थित नव्हता. त्याचाही मनसेनं निषेध केलाय.
केंद्र सरकारनं अनुदानित सिलिंडरची संख्या मर्यादित केलीय. वर्षभरात कमीत कमी १२ सिलिंडर अनुदानित दरानं मिळावेत, या मागणीसाठी आरपीआयनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
ऊस उतपादक शेतकऱ्यांची थकीत देणी तातडीनं मिळावीत, तसंच शेतमालावरची निर्यातबंदी उठवण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनेनं साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.
ऊस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी राज्यभरात १ ऑक्टोबरपासून चेतना यात्रा काढण्यात आल्या होत्या. विविध जिल्ह्यातून आलेल्या चेतना यात्रा पुण्यात पोचल्या. त्यानंतर साखर आयुक्त कार्यालय परिसरात जाहीर सभा झाली.