ताम्हिणी ‘अभयारण्यात’ बेसूमार वृक्षतोड

गेल्याच महिन्यात अभयारण्य म्हणून घोषणा झालेल्या मुळशी धरण परिसरातल्या ताम्हणी घाटात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 23, 2013, 12:51 PM IST

www.24taas.com, पुणे
गेल्याच महिन्यात अभयारण्य म्हणून घोषणा झालेल्या मुळशी धरण परिसरातल्या ताम्हणी घाटात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय.
झाडांची वारेमाप कत्तल आणि डोंगर पोखरण्याचं काम बिनबोभाट सुरू आहे. या परिसरातल्या जैवविविधतेवर घाला घालण्याचा हा प्रकार समोर आलाय. सह्याद्रीतील उत्तुंग डोंगर जेसीबी-पोकलेन मशीन लावून फोडले जात आहेत. समृद्ध वनसंपदेवर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्यामुळे या परिसरातील वन्यप्राण्यांना देखील धोका पोहचणार आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तो स्थानिक लोकांच्या जागरूकतेमुळे… मात्र, महसुल आणि वन विभागाकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम घाटातल्या ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. या घाटाला विशेष संरक्षण मिळावं, या उद्देशानं त्याचा समावेश अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वनविभागानं तयार केला होता. ताम्हिणी घाट दुर्मिळ वनस्पती आणि जीवसृष्टीनं समृद्ध आहे. ताम्हिणी हे निमसदाहरीत वनांच्या प्रकारात मोडतं. या भागात सिरपिजीया हुबेरी, फेरीया इंडिका, सायटोक्लाइन लुटीया, सिरपीजीया मॅकॅनी अशा दुर्मिऴ वनस्पती आढळतात. शिवाय शेकरु, सांबर, पिसोरी आणि बिबट्यांचं इथे वास्तव्य आहे. गिधाडांची संख्याही जास्त आहे.