उचलून `खंडा तलवार`, `येळकोट येळकोट जय मल्हार`!

सा-या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या खंडोबा देवाचं तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पध्दतीने मर्दानी दसरा साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षापासून इथं असलेल्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सा-यांच्या डोळ्याचे पारणं फिटतं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 15, 2013, 08:35 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, जेजुरी
सा-या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या खंडोबा देवाचं तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पध्दतीने मर्दानी दसरा साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षापासून इथं असलेल्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सा-यांच्या डोळ्याचे पारणं फिटतं.
येळकोट येळकोटचा गजर... पिवळ्या धमक भंडा-याची उधळण... सनई चौघडे, भक्तीगीत आणि अंगात सळसळता उत्साह आणणारी तलवारबाजी. सा-या महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा खंडेरायाच्या नवसाला भाविकांनी गर्दी केली आहे. नवसाला पावणारा खंडेराया या श्रद्धेनं भाविक सणासुदीच्या दिवसात जेजुरीला आवर्जून हजेरी लावतात... दस-याच्या दिवशी तरी संध्याकाळी गडावरुन खंडोबाची पालखी सीमोल्लंघनासाठी निघते. जेजुरी गडाची पालखी रमणा दर्शन घेऊन मंदिराकडे मार्गस्थ होते. भंडा-याची उधळण आणि मिरवणुकीनंतर रंगतात ते मर्दानी खेळांची स्पर्धा.. १३ वर्षापासून साठीतले भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.. तब्बल ४२ किलोची खंडा तलवार दातानं उचलत मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा रंगते..
४२ किलो वजनाची खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षापूर्वी अर्पण केलीय…तेव्हांपासून दस-यानंतर दुस-या दिवशी ही तलवार उचलली जाते…आजही पानसेच्या नातेवाईकांनी ही परंपरा जोपासली आहे
अशाप्रकारे मर्दानी खेळातून भक्त खंडोबारायाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करतात.. यानिमित्ताने देवा तुझी सोन्याची जेजुरी असा हा सोहळा भाविक ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवतात...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.