www.24taas.com, झी मीडिया, उजनी
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व इंदापूर तालुक्यातील बाभूळगावी एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर चंदनाचा साठा आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात चार टन रक्त चंदनाचा साठा आढळून आलाय. बाभूळगावमध्ये रानातून संध्याकाळी मजूर परतत असताना त्यांना उसाच्या फडात मोठ्या प्रमाणात लाकडांचा साठा पडलेला दिसला. त्यांनी लगेचच शेतमालकाला याची कल्पना दिली. शेतमालक विठ्ठल लोंढे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांना याची कल्पना दिली. ही साधीसुधी लाकडं नसल्याचं लक्षात येताच पोलिसांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाची तस्करी झाल्याचं उघड झालंय. या परिसरात रक्तचंदन कधीही आढळत नाही. त्यामुळं परराज्यातूनच या रक्तचंदनाची तस्करी होत असल्याचं वनविभागाचं म्हणणंय.
बुधवारी दहा किलोमीटरवर असलेल्या टेंभुर्णी-माढात रक्तचंदनाचा साठा सापडला होता. त्यामुळं तस्करांनी एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी साठा केला असल्याचा संशय वनविभागानं व्यक्त केलाय. मात्र यामुळं उजनी परिसरात रक्तचंदनाची मोठ्य़ा प्रमाणावर तस्करी सुरू असल्याचं उघड झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.