www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील शाब्दिक चकमकींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेलीये. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या विषयावर बोलण्यास चक्क नकार दिला. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या साहेबांची पाठराखण केलीय. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी फायलींच्या रखडपट्टीसाठी राष्ट्रवादीच्या अखत्यारीतील वित्त खात्यालाच जबाबदार धरलंय...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच टीकेचा वार केला... फायलींवर सह्या करण्यासाठी हात थरथरतात.. यांना लकवा मारलंय का, असा भडिमार पवारांनी केला... तर पवारांना योग्यवेळी योग्य ठिकाणी उत्तर देऊ, असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय... पवार आणि चव्हाण यांच्यातील या शाब्दिक चकमकीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पुन्हा कटुता आलीय. या प्रकरणी राष्ट्रवादी काहीशी बॅकफुटवर गेल्याचे जाणवले. अजित पवारांनी याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. तर मीडियाने हा वाद जास्त वाढवू नये, असा सल्ला गृहमंत्री आर. आर. पाटलांनी दिलाय.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र पवारांची बाजू उचलून धरली. लकवा मारलाय म्हणजे प्रशासनाची गती मंदावलीय, असा अर्थ मलिका यांनी काढला.
यानिमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही वादात उडी घेतलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखत्यारीतील वित्त खात्यामुळेच फायली रखडतात, अशी टीका ठाकरेंनी केलीय.
काँग्रेस-राष्ट्रवादीतला हा कलगीतुरा आता कोणत्या थराला जातोय... आणि पवारांना उत्तर देण्याची मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार, याकडे आता लक्ष लागलंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.