पद्म पुरस्कारांत पुण्याला बहूमान...

नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांत पुण्यानं बाजी मारल्याचं दिसून येतंय. कारण, पद्म पुरस्कारांमध्ये सर्वोच्च समजला जाणारा `पद्मविभूषण` हा पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगागुरू बी. के. एस. अय्यंगार या दोघांना जाहीर झालाय आणि उल्लेखनीय म्हणजे हे दोघेही पुण्याचेच सुपूत्र आहेत

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 25, 2014, 11:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांत पुण्यानं बाजी मारल्याचं दिसून येतंय. कारण, पद्म पुरस्कारांमध्ये सर्वोच्च समजला जाणारा `पद्मविभूषण` हा पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगागुरू बी. के. एस. अय्यंगार या दोघांना जाहीर झालाय आणि उल्लेखनीय म्हणजे हे दोघेही पुण्याचेच सुपूत्र आहेत. त्याचप्रमाणे, अंधश्रद्धेविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय... आणि योगायोग म्हणजे डॉ. दाभोळकर हेही पुण्याचेच...

डॉ. माशेलकर यांच्या कारकिर्दीवर एक नजर...
जाहीर झालेल्या १२७ पद्मपुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कारांवर महाराष्ट्राचा ठसा उमटलाय... तर, महाराष्ट्रातल्या मान्यवरांच्या नावांवर लक्ष दिलं तर या पुरस्कारांत पुण्यानं बाजी मारल्याचं उठून दिसतंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदा पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविलं गेलंय.
आपल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. माशेलकर यांना याआधीही पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले होतं. भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ. रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलंय. डॉ. माशेलकर यांना पन्नासहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
पद्मभूषण, पद्मश्री तसेच शांतीस्वरूप भटनागर मेडल, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अॅवॉर्ड हे त्यांपैकी काही होत. तसेच लंडन येथील जगद्विख्यात रॉयल सोसायटी लंडनची फेलोशिपही त्यांना १९९८ मध्ये मिळाली.
बी. के. एस. अय्यंगार यांच्या कारकिर्दीवर एक नजर...
बेल्लूर कृष्णमचार सुंदरराज अय्यंगार यांचा जन्म जरी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातल्या बेल्लूर गावचा असला, तरी त्यांची कर्मभुमी पुणे हीच आहे. गेल्या पाऊणशे वर्षांपासून योगशास्त्राचा अभ्यास, प्रसार, प्रचार आणि अध्यापन करणारे योगाचार्य या विषयावरील अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.