www.24taas.com, पुणे
पुणे विभागात पासपोर्टसाठी अनेकदा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिक चांगलेच वैतागलेत. सरकारी कारभारापेक्षा टाटा कन्सलटन्सी सर्विसेस चांगलं काम करेल अशी अपेक्षा होती. मात्र आधीचाच कारभार बरा होता असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पासपोर्ट ऑफिस बाहेर उभ्या असलेल्या ६५ वर्षांच्या मीना शहा पासपोर्ट नुतनीकरणासाठी गेल्या वर्षभरापासून या ऑफिसच्या चकरा मारत आहेत. चौकशी करायला गेल्यास, उडवा उडवीची उत्तरं मिळत आहेत.
मीना शहा पुण्यात रहात असल्यामुळे त्यांना 15 दिवसांनी येऊन माहिती घेणं शक्य होतं. मात्र पंढरपूरहून आलेल्या उर्मिला बोडकेंना अनेकदा पुण्यात येणं अशक्य होतं. सातारा, कोल्हापूर, सोलापूरमधून येणा-या नागरिकांचीही बोडकेंसारखीच स्थिती आहे.
पुणे विभागातलं पासपोर्टचं काम टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसला देण्यात आलंय. टीसीएसकडून तरी नागरिकांना चांगल्या कामाची अपेक्षा होती मात्र तीनच महिन्यात आधीचा गोंधळ बरा होता. असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलीय. तर हा गोंधळ संपणार तरी कधी याचं पासपोर्ट अधिकाऱ्यांकडेदेखील उत्तर नाही.नागरिकांच्या या संतापाला वेगळं वळण लागण्याआधी पासपोर्ट कार्यालयातला कारभार सुधारावा लागणार हे मात्र निश्चित...