www.24taas.com,पुणे
राज्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलांनी उच्छाद मांडलाय. काल धुळ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन मुंलानी एपीआय धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज पुण्यात अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झालीय.
पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांच्या मुलांनीही एका वकिलावर धारदार शस्त्रांनी वार केल्याची खळबळजनक घटना घडलीय. या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री आर आर पाटलांनी राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचा दावा विधानसभेत केला होता. मात्र त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या गुंड मुलांनी कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली आहेत. थेट पोलीस अधिकारी आणि वकिलावर भरचौकात तलवारी घेऊन नंगानाच चालवलाय.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांच्या मुलांच्या विरोधात चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. महापालिका निवडणुकीच्या वेळी चांदेरे यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातून बाणेरमधील वकील आशिष ताम्हाणे यांच्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
बाणेर रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी समीर चांदेरे, किरण चांदेरे, मनोज इंगवले आणि गणेश इंगवले यांच्या विरोधात चातुश्रींगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एड्व्होकेट आशिष ताम्हाणे यांच्यावर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर आरोपी सापडत नसल्यानं त्यांना अटक नसल्याचं पोलिसांनी म्हटलय.