आश्रमातील कर्मचाऱ्यांकडून ३४ मुलींचा विनयभंग

पेठरोडवरील जय आनंद निराश्रीत अनाथ बालगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी बालगृहात कार्यरत असणार्‍या चौघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Mar 27, 2013, 02:33 PM IST

www.24taas.com, नाशिक
पेठरोडवरील जय आनंद निराश्रीत अनाथ बालगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी बालगृहात कार्यरत असणार्‍या चौघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींचे तेथील चार कर्मचार्‍यांकडून लैंगिक शोषण होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आश्रमात 6 ते 14 वयोगटातील 59 मुले व 34 मुली राहात आहेत. महिला बालकल्याण समितीकडून दर दोन-तीन महिन्यांनंतर आश्रमाची तपासणी करण्यात येऊन येथील कामकाज सुरळीत सुरू आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येत असते. गेल्या दोन दिवसांपूर्वी महिला बालकल्याण समितीचे सदस्य जय आनंद निराश्रीत बालगृहाच्या तपासणीसाठी गेले होते.
समितीच्या महिला सदस्यांना येथील काही मुलींनी या प्रकाराबद्दल माहिती दिल्याने या सर्व प्रकाराला वाचा फुटली. मुलींनी केलेल्या तक्रारींची दखल घेत सोमवारी रात्री उशिरा याबाबत जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सरू आहे.