पुणे विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस!

पुणे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडलाय. या हरकती नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज अखेरपर्यंत सुमारे ५० हजारांवर हरकती दाखल करून पुणेकरांनी शहर बकाल होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 26, 2013, 07:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडलाय. या हरकती नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज अखेरपर्यंत सुमारे ५० हजारांवर हरकती दाखल करून पुणेकरांनी शहर बकाल होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय.
महापालिकेतली ही गर्दी म्हणजे पुणेकरांची सजगता आहे.... पुणेकरांनी याठिकाणी रांगा लावून विकास आराखड्यावरचे आक्षेप नोंदवलेत. पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा प्रारूप विकास आरखडा २८ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलाय. मात्र या आराखड्यात प्रशासन आणि महापालिका सभासदांनी चांगलाच गोंधळ घालून ठेवलाय. नागरी सुविधांसाठीच्या आरक्षणात बदल, शेतजमिनीचे निवासीकरण, एफ एस आय आणि टीडीआरची खैरात यासह अनेक तरतुदींच्या माध्यमातून शहराची वाट लावण्याचाच प्रयत्न या विकास आराखड्यात करण्यात आलाय. शहरातल्या विविध संस्था, संघटना आणि सामान्य नागरिकांनी या तरतुदींवर आक्षेप नोंदवत हा विकास आराखडा फेटाळून लावलाय.
महापालिकेतल्या विरोधी पक्षांनी या विकास आराखड्याला सुरुवातीपासून विरोध केलाय. मात्र शेकडो उपसूचनांच्या माध्यामतून आराखड्यात मनमानी बदल घडवून आणणा-या सात्ताधा-यांनीही विकास आराखड्यावर हरकती नोंदवल्या आहेत.
सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर या विकास आराखड्याच्या प्रसिद्धीला मंजुरी मिळवली होती. हा आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर, तो बिल्डर धार्जिणा आहे, विशिष्ट लोकांच्या हिताचा आहे; तसंच त्यातून शहराचा विकास होण्याऐवजी शहर भकास होणार असल्याची चर्चा सुरु झाली. असं असलं तरी स्वत:च्या शहराचं हित जाणणा-या सुज्ञ पुणेकरांनी हरकती आणि सूचनांच्या माध्यमातून विकास आराखड्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.