www.24taas.com,झी मीडिया,पुणे
राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा विश्वासघात केलाय. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचं नुकसान झालंय अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीय.
पुण्यात सुरु असलेल्या वक्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. विदर्भातल्या स्थानिक निवडणुकींचा संदर्भ देत माणिकरावांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलं. माणिकराव राष्ट्रवादीवर प्रहार करत असताना काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही व्यासपीठावर उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीमध्येच त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केल्यानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान राष्ट्रवादीनं नेहमीच काँग्रेसला मोठ्या भावाप्रमाणे वागणूक दिलीय. मात्र काँग्रेसनेच आपण कसे वागतो याचं आत्मपरित्रण करावं असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते अंकुशराव काकडे यांनी माणिकरावांना दिलंय.
मध्यावधी निवडणुका - राष्ट्रवादी
देशात सध्या मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहतायत. आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिलेत. ३१ तारखेपूर्वी अर्थविधेयक मंजूर झालं नाही तर कोणत्याही क्षणी निवडणुका होऊ शकतात असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिलेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी राष्ट्रवादीची शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पिचड यांनी निवडणुकांची शक्यता वर्तवलीय... या आढावा बैठकीत मध्यावधी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचं समजतंय.
निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कधीही तयार असल्याचंही पिचड यांनी स्पष्ट केलंय.राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळं युपीए सरकार टर्म पूर्ण करणार का याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय.