www.24taas.com, कोल्हापूर
मुलींना समाजात दिल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या अनेक कहाण्या आपण ऐकतच असतो... पण, या सगळ्या समाजाला छेद देत कोल्हापुरातील एका पित्यानं आपल्या मुलीसाठी तब्बल १२ लाख रूपये खर्चून कुस्तीचा आखाडा बांधलाय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या मुलीची जोरदार तयारी या आखाड्यात सुरू आहे.
परंपरेनं पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धेत आता मुलींचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढतोय. पण आपल्या मुलीसाठी बारा लाख रुपये खर्चून चक्क घराशेजारी कुस्तीचा आखाडा म्हणजे तालीम बांधणारे वडिल आपण क्वचितच पाहिले असतील. कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातल्या एका कुस्तीप्रेमींनं मात्र असं केलंय. कोल्हापूरजवळच्या वडणगे येथील अनिल माने यांनी कुस्तीच्या प्रेमापोटी आपली मुलगी सुगंधाला लहानपणापासूनच कुस्तीचे धडे दिले. सुगंधानंही खडतर प्रशिक्षण घेत अनेक स्पर्धा गाजवल्या. नुकत्याच किरगिझीस्तान इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्वही सुगंधानं केलंय. कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूरला जाण्यात जाणारा वेळ लक्षात घेऊन अनिल मानेंनी बारा लाख रुपये खर्चून घराशेजारी सर्वसोयीनीयुक्त कुस्तीचा आखाडा बांधलाय.
दहावीत शिकणारी सुगंधा दररोज सकाळ-संध्याकाळ कोल्हापूरातील शिवाजी स्टेडियमच्या कुस्ती सेंटरमध्ये प्रशिक्षक राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतेय. वडिलांनी ४० फूट रुंद आणि ५० फूट लांब कुस्ती आखाडा बांधल्यानं सुगंधा आता दररोज तिथंच सराव करते. सरावासाठी जादा वेळ मिळत असल्यानं कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्याचा विश्वास सुगंधाला वाटतोय.
ग्रामीण भागातील अनेक गावांत कुस्तीचे आखाडे आहेत, पण त्यातील अनेक आखाडे कुस्तीचे खेळाडू आणि प्रशिक्षक नसल्यानं बंद आहेत. मात्र, सुगंधा माने हिच्या वडिलांनी ग्रामीण भागात राहूनही आपली मुलगी आंतराराष्ट्रीय स्तरावर चमकावी यासाठी स्वखर्चाने बांधलेला आखाडा इतरांना आदर्शवत ठरतोय.