www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
‘बीएसएनएल’च्या नावाखाली तब्बल आठ लाखांना गंडा घातल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात घडलीय. या प्रकरणात मोठं रॅकेट काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी ‘बीएसएनएल’नंही केलीय.
अहमदनगर जिल्ह्यातल्या स्वप्नील आरतीलाल यांची आठ लाखांची फसवणूक करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी ‘बीएसएनएल’ कंपनीचे लेटरहेड तसंच अधिकाऱ्यांच्या सहीसह ५० लाखांचे बक्षीस लागल्याचा मेल त्यांना आला. या मेलसाठी काही ‘चहा-पाणी’ द्यावी लागेल, असं त्यांना सांगण्यात आलं. त्या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून स्वप्नील यांनी एका राष्ट्रीयकृत बॅँकेच्या खात्यात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल सात ते आठ लाख रुपये जमा केले. तरीही, त्यांना बक्षीस काही मिळाले नाही. एव्हढंच नाही तर त्यांनी जमा केलेले पैसेही गायब झाले.
यासंबंधी त्यांनी चौकशी केल्यानंतर ‘अशा प्रकारची कोणतीही बक्षीस योजना नसल्याचं ‘बीएसएनएल’नं स्पष्ट केलं. या घटनेची गंभीर दखल घेत ‘या प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करुन गुन्हा दाखल करण्यात येणार’ असल्याचं ‘बीएसएनएल’चे जनरल मॅनेजर ए. सोमाणी यांनी सांगितलंय.
ई-मेलद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार शहरी भागात नवे नाहीत. आता फसवणुकीचं हे लोण ग्रामीण भागातही पसरु लागलंय. त्यातचं या टोळीनं आता ‘बीएसएनएल’चं नाव वापरल्यानं याचं गांभीर्य आणखी वाढलंय. त्यामुळे हे फसवणुकीचे रॅकेट लवकरात लवकर शोधण्याची मागणी करण्यात येतीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.