www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलीय. दाभोलकर हत्या प्रकरण आणि मुंबई बलात्कार प्रकरण याविषयी महत्त्वाची माहिती मिळेल, अशी अपेक्षा होती.... पण घडलं वेगळंच....
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी संध्याकाळी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेची ही दृश्यं...संध्याकाळी पाच वाजताच्या या पत्रकार परिषदेचे निरोपही अगदी ऐन वेळी घाईघाईनं देण्यात आले. मुंबईतलं सामूहिक बलात्कार प्रकरण, नरेंद्र दाभोलकरांची हत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महत्त्वाची माहिती देतील, अशी अपेक्षा होती. पण घाईघाईनं बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आमदार विनायक निम्हण यांची तळी उचलण्याचं काम करत दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार विनायक निम्हण यांना क्लीन चीट देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेचा हा खटाटोप केला होता का, असा प्रश्न आता विचारला जातोय.
मुख्यमंत्री फक्त आमदार निम्हण यांना क्लीन चीट देवून थांबले नाहीत तर, आमदार निम्हण यांच्या विरोधात हे राजकीय षड्यंत्र असल्याचंही त्यांनी सांगून टाकलं. आमदार निम्हण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी उप-मुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणाकडे होता हे स्पष्ट आहे. मात्र, स्वछ प्रतिमेच्या पृथ्वीराज बाबांनी एका आमदाराला क्लीन चीट देण्यासाठी पत्रकार परिषदेचा केलेला खटाटोप न पटण्यासारखाच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.