अजितदादा बदलले?

इंदापूरमधल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये आज पहिल्यांदाच दाखल झाले.

Updated: May 2, 2013, 01:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
इंदापूरमधल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये आज पहिल्यांदाच दाखल झाले. अत्यंत संयमी वागणारे, मोजकंच भाषण करणारे आणि कार्यक्रमस्थळी सगळ्यांशी सलगीनं बोलणारे अजित पवार यावेळी पहायला मिळाले.
दुधानं ओठ पोळले की ताकही फुंकून प्यावं… ही उक्ती सध्या महाराष्ट्रात कोण तंतोतंत पाळत असेल , तर ते उपमुख्यमंत्री अजित पवार… रोखठोक आणि स्पष्ट बोलणाऱ्या दादांनी दुष्काळग्रस्तांबाबत इंदापूरमधल्या सभेत बेताल वक्तव्य केलं आणि त्यांचं रोखठोक बोलणं अख्या महाराष्ट्रान नामंजूर केलं. राजकीय दृष्ट्या मोठी चूक झाल्याचा साक्ष्त्कार दादांना झाला आणि त्यांनी थेट कराडला जात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी आत्मक्लेश केला.

या आत्मक्लेशानंतर दादा बदलले का हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता.. अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यात एका कार्यक्रमस्थळी येताच सर्वांशी अत्यंत आपुलकीनं वागले. भाषणही मोजून मापून आणि तेही टिपणं पाहतंच केलं. दादांनी संप करणाऱ्यांनी सरकारला वेठीस धरू नका असं सांगितलं. पण ते नेहमीच्या त्यांच्या रोखठोक शैलीत नाही तर अत्यंत संयमी पद्धतीनं.

ज्या यशवंत राव चव्हाणांच नाव घेतल्याशिवाय राज्यातल्या नेत्यांच राजकारण होत नाही, त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळी अजित दादांनी बेताल वक्तव्याचं प्रायश्चित्त म्हणून आत्मक्लेश केला. त्याचा परिणाम काय होतो याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. सध्या तरी अजित पवार अत्यंत संयमी वागण्याचा प्रयत्न करतायेत