वाढदिवसाच्या दिवशीच पवारांचं तोंड झालं कडू!

बारामतीच्या जिरायती भागात शरद पवारांचा गोड वाढदिवस पाणी प्रश्नामुळे कडू झालाय. तालुक्याच्या बावीस जिरायती गावांत कायमस्वरूपी पाणी मिळावं, म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य जनता आज रस्त्यावर उतरली. कधी नव्हे तो आज लोकनेत्याविरुध्द संघर्ष विकोपाला गेलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 12, 2013, 09:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
बारामतीच्या जिरायती भागात शरद पवारांचा गोड वाढदिवस पाणी प्रश्नामुळे कडू झालाय. तालुक्याच्या बावीस जिरायती गावांत कायमस्वरूपी पाणी मिळावं, म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य जनता आज रस्त्यावर उतरली. कधी नव्हे तो आज लोकनेत्याविरुध्द संघर्ष विकोपाला गेलाय.
बारा डिसेंबर... केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा वाढदिवस... पण त्यांच्याच बारामती तालुक्यात एकीकडे बागायती भागात आनंद तर जिरायती भागात दुःख... अशी अवस्था निर्माण झालीय. गेली ४५ वर्ष देशाच्या राजकारणात मुख्य भूमिका बजावणाऱ्या लोकनेत्यानं या बावीस गावातला पाणी प्रश्न का दुर्लक्षित ठेवला, हाच सर्वसामन्यांचा प्रश्न आहे. यासाठी आता इथल्या बावीस गावातले शेतकरी पाण्यासाठी जनआंदोलानातून एकत्र आले आहेत. शरद पवार यांचा वाढदिवस असल्यानं हीच नामी संधी साधून काळा दिवस पाळण्याचं ठरलं होतं. यानुसार या २२ गावांपैकी काही गावात काळे ध्वज लावून व्यवहार बंद ठेवण्यात आले. पाण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली. आंदोलन अहिंसा मार्गानं व्हावं, अशी सर्वांचीच भावना होती. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
या भागात आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात आली. या बावीस गावांमधली काळे झेंडे लावत होती आणि पोलीस हे झेंडे उतरवत होते. हाच प्रकार दिवसभर सुरू होता. पाण्यासाठीच्या या आंदोलनाचं चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या ‘झी २४ तास’सह प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींवरही राष्ट्रवादीचे नेते दादागिरी करत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.