बुलडाण्यातील ६६ वर्षीय आजीने जिंकली बारामती मॅरेथॉन

बुलडाण्याची आधुनिक सावित्री. पती अंथरूणाला खिळून आहे. उपचारासाठी पैसे नाहीत. मोलमजुरी करून ती आपला उदरनिर्वाह चालवत आहे. त्यातच तिने आपल्या लाडक्या तिन्ही मुलींची लग्नही लावली. त्यामुळे गाठीला पैसे नाहीत. पती आजारातून उठला पाहिजे, या जिद्दीच्या जोरावर तिने बारामती मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ६६ वर्षीय आजीने पतीच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावत ही मॅरेथॉन जिंकलीही. प्रेमासाठी वाट्टेल ते, हे आजीने दाखवून दिलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 23, 2013, 07:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बारामती
बुलडाण्याची आधुनिक सावित्री. पती अंथरूणाला खिळून आहे. उपचारासाठी पैसे नाहीत. मोलमजुरी करून ती आपला उदरनिर्वाह चालवत आहे. त्यातच तिने आपल्या लाडक्या तिन्ही मुलींची लग्नही लावली. त्यामुळे गाठीला पैसे नाहीत. पती आजारातून उठला पाहिजे, या जिद्दीच्या जोरावर तिने बारामती मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ६६ वर्षीय आजीने पतीच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावत ही मॅरेथॉन जिंकलीही. प्रेमासाठी वाट्टेल ते, हे आजीने दाखवून दिलेय.
तीन किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन दौड. पाचवीला गरीबी पुजलेली असल्याने या आजींना मॅरेथॉनसाठी चक्क अनवाणी धावावे लागले. विशेष म्हणजे या आजीबाईंनी चक्क नऊवारी साडीवरच आपली स्पर्धा पूर्ण केली नाही तर ती जिंकूनही दाखविली. या आजीचे नाव आहे, कला भगवान करे. कला या आजींनी ही स्पर्धा जिंकून उपस्थित क्रीडाशौकिनांची मने जिंकली. तिचा उत्साही दांडगा असून तरूणांना लाजवेल असाच आहे. आपल्याला प्रकृतीने साथ दिली तर आणखी स्पर्धांमध्येही सहभागी होऊ, अशी इच्छा या ६६ वर्षीय कलाआजीने व्यक्त केली.
लता भगवान करे यांनी बारामती मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये पहिल्या आल्यात. लताबाई मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरच्या. मोलमजुरीच्या जोरावर तीन मुलींची लग्न लावून दिली. आता हाताला काम शोधण्यासाठी बारामतीत आल्या. त्यांचे पती भगवान करे हे हदय विकाराच्या आजारानं अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या उपचारासाठी थोडा पैसा मिळावा म्हणून लताबाईंनी बारामती मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि नववारी साडीमधली ही ६६ वर्षांची बाई कडाक्याच्या थंडीत कुठल्याही स्पोर्टशूज शिवाय धावली.

पत्नीच्या य़ा कामगिरीचा भगवान करेंना प्रचंड अभिमान आहे. रोज शेतीची कामं, घरकाम आणि पतीची सेवा एवढं सगळं सांभाळत लताबाईंनी हे यश मिळवलं. या मॅरेथ़ॉनसाठी लताबाईंना ना प्रॅक्टिस करावी लागली, ना स्पेशल डाएट करावं लागलं, ना कुठले स्पोर्टस शूज लागले. आजारी नव-याला बरं करायचं एवढं एकच ध्येय होतं आणि त्यासाठी ६६ वर्षांची ही आजी तुफान मेलसारखी धावली आणि जिंकलीही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.