नाशिक महापालिका निवडणुका होणार पुन्हा?

नाशिक महापालिकेची निवडणूक पुन्हा व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी दररोज न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पराभूत उमेदवार एकत्र आले आहेत.

Updated: Mar 4, 2012, 10:31 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिक महापालिकेची निवडणूक पुन्हा व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी दररोज न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पराभूत उमेदवार एकत्र आले आहेत.

 

नाशिक शहरातील सर्व पराभूत उमेदवारांना आपल्या हक्काचीही मते न मिळाल्याची तक्रार आहे. तब्बल दीड लाख नावे मतदारयादीत दोनदा आढळल्यानं नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतला बोगसपणा पुराव्यानिशी समोर येतो आहे. काहींनी निवडणूक प्रक्रीयेचा शोध घेतला असता राष्ट्रवादीचे उमेदवार गोकुळ पिंगळे यांच्या प्रभागात मतदान करणाऱ्या व्यक्ती जास्त तर प्रत्यक्षात मशिनमध्ये कमी मतदान असल्याचं आढळलं आहे.

 

अनेक दुबार नावांवर मतदान झाल्याची त्यांची तक्रार आहे. त्यासाठी बोगस वोटींग कार्डसचा गैरवापर झाला आहे. त्यामुळं पुन्हा निवडणुकीची मागणी पराभूत उमेदवारांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीतल्या गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मात्र निवडणुक मतदारयाद्या तयार करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या तपासावरच अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. दोषींना अटक होण्याबरोबरच सीबीआय चौकशीची मागणी पराभूत उमेदवारांनी केली आहे.