www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्न
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं इंग्लंडच्या अँडी मरेचा 6-3, 6-4, 6-7, 6-3 असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे फेडरर आणि राफेल नदाल आमने-सामने येणार आहेत.
गेल्या मोसमात एकही ग्रॅण्ड स्लॅम न जिंकणाऱ्या फेडररनं या स्पर्धेत जिगरबाज कामगिरी केलीय. विम्बलडन विजेत्या मरेविरुद्ध त्याचा बुधवारी सामना होता. या सामन्यात फेडररनं पहिले दोन सेट जिंकत सुरुवात तरी झोकात केली. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये मरेनं फेडररला पराभूत केलं. चौथ्या सेटमध्ये फेडररनं पुन्हा एकदा कमबॅक करत चौथा सेट 6-3 असा जिंकत सेमी फायनलमध्ये धडक मारली.
`मला वाटतं, की अँडी चांगला खेळलाय. त्यानं माझ्यावर दबाव निर्माण केला आणि दुर्भाग्य म्हणजे मी तिसऱ्या सेटमध्ये मॅच संपवू शकलो नाही. परंतु तरीही, शेवटच्या चार जागांमध्ये प्रवेश मिळवून मी खूप खूश आहे` असं फेडररनं म्हटलंय. फेडररनं सलग अकराव्या वेळेस ऑस्ट्रेलिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलाय.
आता सेमी फायनलमध्ये फेडररची लढत स्पेनच्या राफेल नदालशी होणार आहे. त्यामुळे फेडरर आणि नदाल या दोन अनुभवी खेळाडूंमधली तगडी झुंज टेनिसविश्वाला पुन्हा एकदा अनुभवयाला मिळेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.