... आता भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनचं निलंबन

इंटरनॅशनल अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन (एआयबीए)नं गुरुवारी रात्री उशीरा भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनच्या (आयएबीएफ) निलंबनाची घोषणा केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 7, 2012, 12:57 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय ऑलिंपिक असोसिएशन (आयओए) च्या निलंबनानंतर दोन दिवसही उलटले नाहीत तोच भारतीय खेळ जगताला पुन्हा एकदा जोरदार झटका बसलाय. इंटरनॅशनल अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन (एआयबीए)नं गुरुवारी रात्री उशीरा भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनच्या (आयएबीएफ) निलंबनाची घोषणा केलीय.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या आयएबीएफच्या निवडणूक प्रक्रियेत झालेल्या राजकिय हस्तक्षेपामुळे आणि आंतरराष्ट्रीय अव्यावसायिक बॉक्सिंग संघटनेच्या निवडणूक नियमांच उल्लंघन केल्याचं सांगत ही कारवाई करण्यात आलीय. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनंतर आता भारतीय बॉक्सिंगवर झालेल्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्रीडा क्षेत्राची चांगलीच नामुष्की ओढावलीय.
सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या संघटनेच्या वार्षिक बैठकीमध्ये भाजप नेते अभिषेक सिंह मल्होत्रा यांची सभापती तर अभय सिंह चौटाला यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. आयएबीएफच्या मते, पटियालामध्ये झालेल्या या बैठकीत चौटाला यांना अध्यक्ष पदावर स्थानापन्न करण्यासाठी नियमांत काही नवे शोध काढण्यात आले होते.
इंटरनॅशनल अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन (एआयबीए) म्हणण्यानुसार, इंटरनॅशनल ऑलिंपिक संघटनेकडून भारतीय ऑलिंपिक असोसिएशनवर घातलेल्या बंदिच्या निर्णयानंतर एआयबीएच्या कार्यकारी कमिटीनं ६ डिसेंबर २०१२ रोजी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनवर (आयएबीएफ) अनिश्चित काळासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. आईएबीएफच्या निवडणुकीतील लागेबांध्याबद्दल मिळालेल्या माहितीनंतर हे पाऊल उचलण्यात आलंय.
एआयबीए या निवडणुकीबद्दल चौकशी करणार आहे. मुख्यत्वे आयओएचे माजी सभापती आणि आयएबीएफ निवडमुकीच्या राजनैतिक काही संबंध आहेत का यावर लक्ष केंद्रीत केलं जाईल. गुरुवारी स्वित्झर्लंडच्या लुसानामध्ये झालेल्या बैठकीनंतर इंटरनॅशनल बॉडीच्या वतीनं आयएबीएफचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.