तब्बल सहा महिन्यानंतर शुमाकर कोमातून बाहेर

तब्बल सात वेळा फॉर्म्युलावन चॅम्पियनशिप आपल्या नावावर करणारा मायकल शुमाकर अखेर कोमामधून बाहेर आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 16, 2014, 04:32 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, पॅरिस
तब्बल सात वेळा फॉर्म्युलावन चॅम्पियनशिप आपल्या नावावर करणारा मायकल शुमाकर अखेर कोमामधून बाहेर आलाय. त्याला हॉस्पीटलमधून डिस्चार्जही देण्यात आलाय.
ही माहिती शुमारच्या कुटुंबीयांनी दिलीय. ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेनंही ही माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलीय. मायकल शूमाकर यांना सीएचयू ग्रेनोबलमधून सुट्टी मिळाली आहे, आता तो कोमात नाही, असं शूमाकरच्या मॅनेजरने जाहीर केलंय.

29 डिसेंबर रोजी पॅरिसमध्ये स्किईंग करतांना मायकल शुमाकरचा अपघात झाला होता. शुमाकरचं डोकं दगडाला आपटलं आणि यातच तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी शुमाकर दीर्घकाळापर्यंत किंवा कायमचा कोमामध्ये राहण्याची भीती व्यक्त केली होती. पण, शुमाकर अखेर तब्बल सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर शुद्धीवर आलाय.
मायकलच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती मात्र अजून मिळालेली नसली तरीही त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. सोशल वेबसाईटवर मायकलविषयी त्याच्या चाहत्यांना वाटणारं प्रेम दिसून येतंय. मायकल शूमाकर यांच्या परिवाराने सर्व डॉक्टर नर्स, थेरपिस्ट यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच शूमाकरचा यापुढील उपचार सार्वजनिक जीवनापासून दूर ठेऊन केला जाणार आहे.

शुमीचा अपघात झाल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. फॉर्म्युला वन करिअरमध्ये शुमाकरनं रेकॉर्डब्रेक ९१ रेसेस जिंकल्या आहेत. ४४ वर्षीय शुमाकरनं २००६मध्ये निवृत्ती घेतेल्यानंतर पुन्हा रेस ट्रॅकवर कमबॅक केलं होतं. मात्र, त्याचं कमबॅक फारसं यशस्वी झालं नाही आणि त्यानं २०१२ मध्ये पुन्हा फॉर्म्युला वनला अलविदा केला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.