www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची `भारतरत्न` पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे. यासंदर्भात क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात क्रीडा मंत्रालयामध्ये समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्य़ात आला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाची शिफारस यावेळेसही करण्यात आलेली नाही.
क्रीडा मंत्रालयानं हॉकीची ओळख असणा-या मेजर ध्यानचंद यांची प्रतिष्ठेच्या भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. क्रिकेटचा देव मास्टर-ब्लास्टरऐवजी ध्यानचंद यांच्या नावाला क्रीडा मंत्रालयानं पसंती दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याची मागणी होतेय.
मात्र, हॉकीला सुर्वण काळ मिळवून देणारे ध्यानचंद यांच्या नावावर क्रीडा मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलं. सचिन तेंडुलकर अजूनही क्रिकेट खेळत आहे आणि भविष्यात त्याला `भारतरत्न` पुरस्कार मिळू शकतो, अशी भूमिका या बैठकीत घेतली गेली. ध्यानचंद यांच्या काळात भारतानं हॉकीमध्ये आपला दबदबा राखला होता.
१९२८, १९३२ आणि १९३६ अशा सलग तीन ऑलिम्पिकमध्ये भारतानं गोल्ड मेडल पटकावलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या हॉकीच्या करिअरमध्ये तब्बल ४०० आंतरराष्ट्रीय गोल झळकावले. भारतला मेडल्स तर ध्यानचंद यांनी पटकावून दिलीच होती. शिवाय देशाच्या कानाकोप-या हॉकी पोहचवण्याचं कामही त्यांनी केलं.
ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा क्रीडा दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. त्यामुळे सचिन तेंडुलकरऐवजी ध्यानचंद यांची भारतरत्न पुरस्कारासाठी निवड करणं योग्य असल्याचं म्हटलं जातंय. ध्यानचंद यांच्या नावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मान्यता दिल्यास `भारतरत्न` हा सन्मान मिळणारे ते पहिले खेळाडू ठरतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.