www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सचिनच्या तुलनेत लाराने आपल्या संघाला जास्त सामने जिंकून दिले, असे अकलेचे तारे ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉटिंगने तोडले आहेत, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. आपल्या संघाला सामने जिंकून देण्याच्या स्पर्धेत सचिन लाराच्या बराच पुढे आहे.
मात्र आकडेवारीवर नजर टाकली तर लारा संघात असताना वेस्ट इंडीजने फक्त २४.४२ टक्के कसोटी सामने जिंकले आहेत, तर तेंडुलकर संघात असताना भारताने ३७.०१ टक्के कसोटी सामने जिंकले आहेत.
तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकली असून त्यातील ५३ शतकांमध्ये भारताला विजय मिळाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने २० कसोटी सामन्यांत भारतला विजय मिळवून दिला असून त्याची सरासरी ३९.०१ अशी आहे, तर लाराने कसोटी सामन्यांत ३४ शतके झळकवली असून त्यात केवळ ८ कसोटी सामन्यांतच तो विंडीजला विजय मिळवून देऊ शकला आहे. म्हणजे त्याची विजयी सरासरी फक्त २३.५२ एवढीच आहे.
याबाबत काही क्रिकेट पंडित म्हणतील, लाराला त्याच्या सहकार्यां कडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तो खेळलेल्या ६३ कसोटी सामन्यांत विंडीजला ४८.०१ टक्के अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यांत संघाने केलेल्या धावांपैकी लाराचा वाटा होता ४४.६७ धावांचा. लाराची १४ शतके त्याच्या संघाला तारू शकली नाहीत.
मात्र सचिनच्या कामगिरीवर नजर टाकली तर सचिन संघात असताना भारत फक्त ५६ कसोटी सामन्यांत पराभूत झाला आहे. तेंडुलकरने या सामन्यांत ४०८८ धावा केल्या असून त्याची फक्त ११ शतके ‘वांझोटी’ ठरली आहेत. तेंडुलकर संघात असताना हिंदुस्थानी संघाने ७२ सामने अनिर्णीत राखले आहेत. त्यात सचिनने २० शतकांसह ५८८७ धावा केल्या आहेत. तर लारा संघात असताना वेस्ट इंडीजने ३६ सामने अनिर्णीत राखले असून लाराने या सामन्यांत १२ शतकांसह ३७०८ धावा केल्या आहेत.
लारा संघात असताना वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना फक्त ८ कसोटी सामन्यांत विजय मिळविला आहे. त्यात या डावखुर्यात शैलीदार फलंदाजाने तीन शतकांसह ७५१ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध खेळताना नऊ सामने जिंकले असून त्यात लाराने फक्त एक शतक झळकविले आहे. लाराच्या उपस्थितीत विंडीज संघ भारतविरुद्ध चार तर दक्षिण आफ्रिका व श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकला आहे. त्या सामन्यांत तो शतक झळकवू शकला नाही. सचिन संघात असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने १६ विजय मिळविले आहेत. त्यात चार शतकांच्या मदतीने त्याने १४०७ धावा केल्या आहेत. सचिन संघात असताना भारतने श्रीलंकेविरुद्ध ११, तर इंग्लंडविरुद्ध ९ सामन्यांत विजय मिळविला असून त्यात प्रत्येकी तीन शतके झळकविली आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.