www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
धावपटू अंजना ठमके आणि कविता राऊतसारख्या आदिवासी खेळाडूना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे प्रशिक्षक वीरेंद्र सिंग यांना दादोजी कोंडदेव पुरस्कारापासून डावलण्यात आलं आहे. वर्तणूक दाखल्यासाठी आलेल्या यादीत त्यांचे नाव वगळण्यात आलंय. नेते आणि क्रीडा विभागाच्या संचालकासमोर चमकोगिरी करणा-या खेळाडूना पुरस्कार दिले जातात का असा प्रश्न आता क्रिडा विश्वात विचारला जातोय.
नाशिक जिल्ह्यातील एक नव्हे तर तब्बल आठ खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे विरेंद्र सिंग हे प्रशिक्षक.. राष्ट्रीय स्तरावरील कविता राऊत, अंजना ठमके, मोनिका आथरेसह अनेक खेळाडूना कठोर प्रशिक्षण त्यांनी दिले. गेल्या दीड दशकापासून कुठलीही आधुनिक सुविधा नसताना आपले काम इमाने इतबारे करणा-या या प्रशिक्षकाचा पुरस्कार यावर्षी डावलण्यात आला आहे. इतकेच नाही तर अंजना ठमकेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळूनही राज्याने त्याची अदयाप दखल सुध्दा घेतली नाही. क्रीडा विभाग तसचं शासनातर्फे कोणतेही बक्षीस जाहीर करण्यात आलेले नाही. नाशिक जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या वर्तणूक प्रमाणपत्र यादीत त्यांचे नाव नसल्याने क्रीडा क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.
राज्याच्या क्रीडा विभागात मैदानावर कामगिरी नव्हे तर कार्यालयात जाऊन चमचेगिरी करणार्यांना सोयी सुविधा मिळत असतात. त्यात भर पडते असोसिएशनच्या लॉबिंगची. राज्य एथलिट संघाने त्यांचे नाव दादोजी कोंडदेव पुरस्कारासाठी नामांकित केले होते. असे असताना वेगवेगळ्या खेळात प्राविण्य मिळविणा-या खेळाडूना तयार केले म्हणून पुरस्कारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुरस्कारासाठी कधीही अर्ज करणार नसल्याचा पवित्रा विरेंद्र सिंग यानी घेतलाय.
क्रीडा खात्याच्या गैरकारभारामुळे गेल्या तीन वर्षापासून विविध पुरस्कार जाहीर झालेले नाहीत. सलग तीन वर्षाचे पुरस्कार तयार होत असताना मुंबईतील सत्तावीस तर पुण्यातील बावीस जणांना पुरस्कार जाहीर करण्याची तयारी केली जातेय. देशभरात नाशिकचा लौकिक वाढत असताना नाशिकला चार-पाच पुरस्कारच का असा प्रश्न आता क्रीडाक्षेत्रात विचारला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.