www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राळेगणमध्ये हंगामा केला... कालचा दिवस कुमार विश्वास यांच्या आरोपांमुळं गाजला, तर आज गोपाळ राय यांनी धिंगाणा केला... अखेर अण्णा हजारेंनीच कान उपटल्यानंतर आपच्या नेत्यांना बेआबरू होऊन राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला.
अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या मांडवात चाललंय काय..? लागोपाठ दोन दिवस एकापाठोपाठ एक नाट्यमय घडामोडींचा सिलसिलाच सुरू झालाय... अरविंद केजरीवालांना ताप आल्यानं त्यांनी आपले तिघे दूत राळेगणमध्ये पाठवले. परंतु या दूतांनीच आपल्या कारवायांनी अण्णांना ताप आणला.. अण्णांच्या आंदोलनात `सरकारी दलाल` सहभागी असल्याचा आरोप करून कुमार विश्वास यांनी काल खळबळ उडवून दिली. तर आज माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांचं भाषण सुरू असताना आपचे नेते गोपाळ राय यांनी मध्येच त्यांना रोखलं... नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठ शेअर करणाऱ्या सिंग यांच्यावर राय यांनी आक्षेप घेतला. त्यावरून उपोषणाच्या मांडवात गोंधळाची स्थिती निर्माण झाली...
या प्रकारामुळं भडकलेल्या अण्णा हजारेंनी राय यांची कडवट शब्दांत कानउघाडणी केली... कधीकाळी सहकारी असलेले `आप`वालेच गोंधळ घालू लागल्यानं, अण्णांनी त्यांचं अक्षरशः कान उपटले... आता अण्णांनीच कान उपटले म्हटल्यानंच राय यांना राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला... अत्यंत बेआब्रू होऊन ते अण्णांच्या आंदोलनातून माघारी परतले...
या सर्व गोंधळामुळं अण्णा हजारे कमालीचे दुःखी झालेत.. काँग्रेस किंवा भाजपवाले नाहीत, तर आपलेच लोक जास्त त्रास देत असल्यानं अण्णा व्यथित झालेत...
जनलोकपाल विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनात जुनी टीम अण्णा आणि नवी टीम अण्णा यांच्यातच लाथाळ्या सुरू झाल्यात.. अण्णांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं प्रत्येकजण आपापला स्वार्थ साधून घेत आहेत... खेदाची बाब म्हणजे या अंतर्गत कलहावर दस्तुरखुद्द अण्णांचाही वचक राहिलेला नाही... उपोषणाच्या मांडवात सुरू असलेलं ही नाटकं पाहता `कालचा गोंधळ बरा होता...’असं म्हणायची पाळी आलीय...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.