www.24taas.com, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील निम्न प्रकल्प बांधकामाच्या दर्जाबाबत प्रकल्पग्रस्तांनी शंका उपस्थित केलीय. हे बांधकाम निकृष्ट असून त्याच्या चौकशीची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केलीय. विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या गुणवत्तेविषयी सरकारला पत्र पाठवलंय.
जळगाव जिल्ह्यातला निम्न तापी प्रकल्प निकृष्ट दर्जाचा असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंते विजय पांढरे यांनी केला होता. पांढरेंच्या पत्रामुळं राज्याच्या राजकारणात भूकंप झालाय. आता, प्रकल्पग्रस्तांनीही या प्रकल्पाचं बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप केलाय. या प्रकल्पाच्या बांधकामातल्या भोंगळ कारभाराचा पाढाच प्रकल्पग्रस्तांनी ‘झी २४ तास’पुढं वाचला. टेंडरमध्ये चाचणी केलेला पांझरा नदीवरील टणक दगड वापरणं सक्तीचं होतं. मात्र, त्याऐवजी नदीपात्रातल्या ठिसूळ दगडाचा वापर करण्यात आला. सीओटीमध्ये काळ्याऐवजी तांबड्या मातीचा भराव टाकण्यात आला. हैदराबादच्या श्रीनिवासन कंपनीला प्रकल्पाचं बांधकाम देण्यात आलं होतं. मात्र, या कंपनीनं दुस-या एका कंपनीला प्रकल्पाचं सबकॉन्ट्रॅक्ट दिलं. त्यामुळं प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत प्रकल्पग्रस्तांनी शंका उपस्थित केलीय.
या प्रकल्पातल्या निकृष्ट बांधकामाला अधिकारीही दोषी असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केलाय. त्यामुळं याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केलीय. या प्रकल्पाचे आतापर्यंत केवळ ३० ते ३२ टक्के काम पूर्ण झालंय. त्यावर सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च झालेत. मात्र, विजय पांढरेंचे दावा आणि त्याला प्रकल्पग्रस्तांकडून मिळालेला दुजोरा यामुळं सरकारचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झालीय.