www.24taas.com, सातारा
आज सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा युवती मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यासाठी सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवारही साताऱ्यात उपस्थित राहिलेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर देतानाच सिंचन प्रश्नावर श्वेतपत्रिका लवकर सादर करण्याविषयी पुनरुच्चार केलाय.
सिंचन प्रश्नावर श्वेतपत्रिका लवकर सादर करा, सत्य परिस्थिती लवकरच लोकांसमोर येईल, असं म्हणतानाच अजित पवार यांनी आपण सरकारबाहेर राहून जनकल्याणाची कामं करणार असल्याचं म्हटलंय. अजित पवार यांनी, राजकारणात इमेज जपण्याला जास्त महत्त्व आहे पण मी माज्या इमेजपेक्षा लोकांचे प्रश्न सोडवण्याला जास्त महत्त्व देतो... मी कामं शिल्लक ठेवत नाही त्यामुळेच तातडीनं कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला’असं म्हणतानाच काही जण फाइल्स का अडवून ठेवतात, त्याची कारणं मला माहित नाही, असा टोमणा मुख्यमंत्र्यांना लगावलाय.
माणिकरावांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ‘लोकशाहीमध्ये प्रत्येक सडेतोड उत्तर देण्याचा अधिकार आहे... सरकारमधल्या लोकांना रुसायचं काहीच कारण नाही, त्यांनी मला राजीनामा द्यायला सांगितलेला नाहीए... आम्ही पदासाठी हपापलेलो नाही’असं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाच वर्षांत धरणांची किंमत दुप्पट होते, हे सांगताना प्रकल्पांच्या किंमतीत कशी वाढते याचा पाढाच अजितदादांनी यावेळी वाचून दाखवला. यावेळी ‘राजीनाम्यानंतर काही कार्यकर्ते भावनिक झाले पण त्यांनी आता आंदोलन करू नये’अशा शब्दात दादांनी काही कानपिचक्या आपल्या समर्थकांनाही दिल्यात.
यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंते विजय पांढरे यांच्या आरोपांना उत्तर देताना ‘पांढरेंचं पत्र मला उशीरा मिळालं... त्यांनी माझ्याशी चर्चा का केली नाही?’ असा उलट सवालही दादांनी केलाय. बांधकामाच्या निष्कृष्ट दर्जाचं खापरही दादांनी अधिकाऱ्यांवरच फोडलंय.