www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे. किमान निर्यातमुल्यात झालेली वाढ, हवामानातील बदल, केंद्र आणि राज्य सरकारातील असमन्वय यामुळं शेतकरी धास्तावला आहे. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होणार असल्यानं वर्षाखेरीस कांदा रडविण्याची चिन्हं आहेत.
राज्यात सध्या साठ ते सत्तर हजार लाख हेक्टरवर कांदा लागवड झालीय. गारपीट आणि अवकाळी पावसानं यावर्षी तीस ते चाळीस टक्के कांदा खराब झाला. त्यामुळं कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा होऊन नव्या हंगामात बियाण्यांचा काळाबाजार वाढला. एरवी अडीच ते तीन हजार रुपये पायली मिळणारं कांद्याचं बी सध्या पंधरा हजार रुपये पायली झालंय. एवढं महागडं बी खरेदी करून त्या मानानं उत्पन्न मिळेल का, ही भीती शेतकऱ्याला असल्यानं तो कांद्याची पेरणी अपेक्षित प्रमाणात करत नाहीय. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून मान्सूनही आळशीपणा करतोय. त्यामुळं नवं पीकही उशिरानं येणार आहे. परिणामी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्या कांद्याचा तुटवडा वाढून कांदा प्रचंड महाग होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, आंध्र प्रदेशातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळं देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक मंदावणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी आतापासूनच कांदा लागवड आणि निर्यातील प्रोत्साहन द्यायला हवं. बी बियाणं, खतं यांचा मुबलक पुरवठा करण्याची गरज आहे. नाही तर काही महिन्यातच कांदा किलोमागे शंभरी गाठू शकतो.
इराकमधल्या यादवीमुळं महागाईचं संकट देशाच्या उंबरठ्यावर आहे, असं असतांना त्याला कांदा भाववढीची फोडणी पडली, तर भाजपचे अच्छे दिन संकटात येऊ शकतात. कांद्यानं आतापर्यंत देशातली सरकारही पाडलीयत, हा इतिहास भाजपला विसरुन चालणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.