www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
‘माझा नवरा पिढीजात करोडपती’ असल्याचा अजब दावा सतीश चिखलीकरची पत्नी स्वाती चिखलीकरनं केलाय. तर सापडलेले नऊ किलो सोन्याचे दागिने माहेरच्यांनी दिल्याचा दावाही तिनं केलाय.
सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकरला लाच घेताना रंगेहाथ केल्यानंतर त्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत अँन्टी करप्शन ब्युरोला लॉकर्समध्ये कोट्यवधींची कॅश आणि किलोनं सोनं मिळालं होतं. यावर ‘सतीश चिखलीकरच्या वडिलांची ६० ते ७० एकर जमीन आहे. या जमिनीवर वर्षानुवर्ष उत्पन्न होतं. याच जमिनीतल्या उत्पन्नावर कोट्यवधी रुपये कमवलेले आहेत. आणि सोन्याचं म्हणाल, तर मला दागिने लग्नामध्ये मिळालेले आहेत. सासूबाईंकडून मिळालेले आहेत’ असा न पटणारा दावा त्यांनी केलाय. ‘झी मीडिया’ला दिलेल्या एक्सक्लुझीव्ह मुलाखतीत त्यांनी हे दावे केलेत. तसंच आपण तपासात पोलिसांना सहकार्य केल्याचंही त्यांनी म्हटलंय.
चिखलीकरांना एकटं सोडलं?
घोटाळा समोर आल्यानंतर आणि चिखलीकर अडकल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांना एकटं सोडलंय का? त्यांना टार्गेट केलं जातंय का? असा प्रश्न स्वाती चिखलीकर यांना विचारला गेला. यावर काही बोलण्यासाठी स्वाती चिखलीकर यांनी तोंड उघडलं पण त्यांचा आवाज तिथंच थांबला. या प्रश्नावर त्या काही बोलू शकल्या नाहीत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.