संशयपिसाट प्रियकराला फाशीची शिक्षा!

नागपूरच्या बहुचर्चित धनश्री रामटेके हत्याप्रकरणी आरोपी धर्मवीर चव्हाणला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय तर त्याचा मित्र सोनू उर्फ चेरी सदाशिव राऊतकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2013, 03:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरच्या बहुचर्चित धनश्री रामटेके हत्याप्रकरणी आरोपी धर्मवीर चव्हाणला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय तर त्याचा मित्र सोनू उर्फ चेरी सदाशिव राऊतकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलीय.
१४ ऑगस्ट २०१२ रोजी धनश्री रामटेकेचा तिचा प्रियकर धर्मवीर चव्हाणनं नायलॉनच्या ओढणीनं गळा दाबून खून केला होता. त्यानंतर त्यानं ट्रकच्या टायरनं मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. यासाठी त्याला त्याचा मित्र पंकज रूतकर यानं मदत केली होती. धनश्रीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध आहेत, असा संशय असल्यानं पंकजनं हे कृत्य केलं होतं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एल. व्यास यांनी काल गुरुवारी दोन्ही आरोपींना दोषी जाहीर केलं होतं.
संशयाने घेतला धनश्रीचा बळी
धरमवीर श्रीराम चव्हाण (२४) आणि पंकज ऊर्फ सोनू ऊर्फ चेरी सदाशिव राऊतकर (२२) हे दोघेही पलोटीनगर येथील रहिवासी आहेत. धनश्री नीळकंठ रामटेके, असे मृत कॉलेज तरुणीचे नाव होते. ती गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणीनगर येथील रहिवासी होती. धरमवीर चव्हाण याचे घटनेच्या दीड वर्षांपासून धनश्रीसोबत प्रेमसंबंध होते. तिने दुसऱ्यासोबत बोलणे त्याला पसंत नव्हते. घटनेच्या १५ - २0 दिवसांपूर्वी छावणी पूनम चेंबरसमोर दोघांचे भांडणही झाले होते. त्यावेळी धरमवीरने तिला मारहाण करून जखमी केले होते. धनश्रीचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे त्याने धनश्रीला कायमचे संपविण्याचे ठरवले होते.
धनश्री नेहमी सायंकाळी ६ वाजता आपल्या एमएच ३१ - सीडब्ल्यू - ९२६६ क्रमांकाच्या डिओने शिकवणी वर्गासाठी जायची आणि रात्री ८.३0 वाजता घरी परत यायची. १४ ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे सायंकाळी घरून निघाली होती. त्यानंतर ती कधीही घरी परतलीच नव्हती.
शिकवणी वर्गासाठी गेलेली धनश्री घरी परतील नाही म्हणून आई, वडील, भाऊ आणि मामाने सर्वत्र तिची शोधाशोध केली होती. परंतु ती कोठेही आढळली नव्हती. धरमपेठेत राहणारे धनश्रीचे मामा राजेश डहाट यांनी त्याच रात्री गिट्टीखदान पोलीस ठाण्यात धनश्रीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. १५ ऑगस्टला सर्वत्र स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास धनश्रीचा कोळसा व राख झालेला मृतदेह आढळला होता. केवळ डावा पाय गुडघ्यापासून शाबूत होता. पायाच्या बोटांवर नेलपॉलिश होते. घटनास्थळावर तिची सँडल पडलेली होती.

धनश्रीच्या खूनानंतर...
धनश्रीचा खून केल्यानंतर नराधम धरमवीर आणि सोनूने सैतानालाही लाजविणारे क्रूर कृत्य केले. या दोघांनी धनश्रीच्याच डिओवर तिचा मृतदेह मध्ये बसविला होता. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत दोघेही उत्थाननगर गोरेवाडा वस्तीच्या मार्गाने रवाना झाले होते. मृतदेह त्यांनी ग्रीन व्हॅली फार्महाऊससमोरच्या टेकडीवरील झुडपात फेकून दिला होता. त्यानंतर सोनू हा धरमवीरला सोबत घेऊन आपल्या घरी आला होता. त्याने डिओ लपवून ठेवली होती. त्यानंतर हे दोघे शाईन मोटरसायकलने अवस्थीनगर चौकात गेले होते. त्यांनी येथील जावेदखान शमी उल्लाखान याच्या दुकानासमोरील ट्रकचा टायर चोरला होता. हा टायर धनश्रीचा मृतदेह असलेल्या ठिकाणी नेला होता. मृतदेह टायरवर ठेवून पेट्रोल ओतून पेटवून दिला होता. आरोपींनी धनश्रीची डिओ मोमीनपुरा भागात बेवारस सोडून दिली होती.
१४ ऑगस्टच्या रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास धरमवीर याने धनश्रीसोबत मोबाईलवर संपर्क साधून मानकापूर रिंगरोड येथे भेटण्यास बोलावले होते. ठरल्याप्रमाणे ती आपल्या डिओने त्याला भेटण्यास गेली होती. धरमवीर हा आधीच आपला मित्र सोनू राऊतकर याच्या घरी आपल्या एमएच - ३१ - सीक्यू - ७३८६ क्रमांकाच्या शाईन मोटरसायकलने जाऊन तेथे थांबला होता. त्यानंतर त्याने सोनूला आपली मोटरसायकल दिली आणि धनश्रीला मानकापूर रिंगरोड येथून आणण्यास सांगितले होते. सोनूने तिला आपल्या घरी नेल्यानंतर सोनू आणि धरमवीर हे दोघेही दारू प्याले होते. त्यानंतर सोनू हा दोघांनाही सोडून घराबाहेर निघून गेला होता. दुसर्याा तरुणासोबत संबंध असल्याच्या कारणावरून धनश्री आणि धरमवीरमध्ये बाचाबाची झाली होती. त्याच वेळी सोनू घरी परत आला होता. त्यानंतर या दोघांनी नायलॉन दोरीने धनश्रीचा गळा आवळून निर्घृणपणे खून केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.