www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.
सरकारनं जिरायती शेतीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये अशी अंत्यत कमी नुकसान भरपाई दिली आहे. एवढंच नव्हे तर ही मुदत फक्त २ हेक्टरपर्यंतच मर्यादीत आहे. गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकरी आत्महत्याही करत आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे, असा सरकारतर्फे सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्ष कृती मात्र तशी शेतकऱ्यांची चेष्टा करणारी ठरली आहे.
फळबागांसाठी फक्त बियाण्यांचा खर्च एकरी ५० हजारांपासून एक लाखांपर्यंत असतो. अशा शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी फक्त २५ हजारांची मदत जाहीर केली आहे. म्हणजे एकरी फक्त दहा हजार रुपये ही मदत पडते. ही मदत अंत्यंत तुटपुंजी आहे. जिरायती शेतीसाठीही फक्त बियाण्यांचा खर्च एकरी ६ हजार येतो. अशा शेतकऱ्यांनाही एकरी अडीच हजार रुपयेच मिळणार आहे. म्हणजे बियाण्यांचा खर्चही या मदतीतून निघणार नाही. सरकारच्या या तुटपुंज्या मदतीमुळं शेतकरी संतापले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.