www.24taas.com, अमरावती
अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही विषाणुजन्य आजारानं कहर केलाय. वेगवेगळ्या आजारानं मागील अडीच महिन्यात सतरा जणांचा मृत्यू झालाय. तर अद्याप शेकडो नागरिक खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मागील वर्षी एकट्या वरुड तालुक्यात एका महिन्यात सुमारे वीस जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टींनी या भागाचा दौरा केला होता. स्थानिक आमदारांनी तर यंदा पावसाळा सुरु होण्यापूर्वीच सुचनाही केल्या होत्या मात्र त्यावर कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत त्यामुळे ही साथ पसरल्याचा आरोप आमदार अनिल बोंडे यांनी केलाय तर प्रशासनानं नेहमीप्रमाणे आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय.
पावसाळा सुरु होण्यापूर्वीच गावागावात जाऊन स्वच्छतेच्या सुचना आणि उपाय केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र तरीही ही साथ पसरल्यामुळे प्रशासनाचे दावे आणि उपाय किती फोल आहेत हेच दिसून येतंय. या साथीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याची नागरिकांची मागणी आहे.