अभयारण्यात आज `मचाण सेन्सस`...

देशातील अभयारण्यांसाठी आजचा बुद्ध पौर्णिमेचा दिवस विशेष आहे. कारण आज वन्यप्राण्यांची गणना होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 25, 2013, 05:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
देशातील अभयारण्यांसाठी आजचा बुद्ध पौर्णिमेचा दिवस विशेष आहे. कारण आज वन्यप्राण्यांची गणना होणार आहे. वन्यजीव प्रेमींसाठी हा अनुभव मोलाचा असतो. देशभरातील अभयारण्यात ‘वॉटर होल सेन्सस’ किंवा ‘मचाण सेन्सस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभ्यासात वन्यजीव वैभवाच्या नोंदी घेतल्या जातात.
बौद्ध पौर्णिमेचा दिवस हा देशभरातील वन्यप्रेमींसाठी विशेष असतो. देशातले व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात या दिवशी वन्यप्रेमी, हौशी अभ्यासक, वन विभागाचे कर्मचारी व्याघ्र गणनेसाठी एकत्र येतात. अभयारण्यात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यावर जंगलातले प्राणी पाणी पिण्यासाठी हमखास येत असतात. यासह या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी काही विशिष्ट ठिकाणी उन्हाळ्यात खास पाणवठे बांधून त्यात टॅँकरद्वारे पाणी सोडलं जातं. अशा सर्व ठिकाणी पाणवठ्यावर थोड्या उंच जागी लपता येईल अशा बेताने मचाण बांधली जाते. यंदा ताडोबा अभयारण्यात अशा एकूण १५२ मचाणी बांधण्यात आल्यात. प्रत्येक मचाणीवर एक वन कर्मचारी व दोन हौशी वन्यजीव प्रेमी अशा तिघांच्या बसण्यासाठी व्यवस्था केली जाते. व्याघ्रगणणेचा लाईफ टाईम अनुभव घेण्यासाठी वन्यजीवप्रेमींनी एकच गर्दी केलीय.

जंगल ही मानवासाठी नेहमीच एक अद्भुत दुनिया समजली जाते. अशा प्राणी गणनेच्या माध्यमातून सामान्य नागरिक व हौशी, वन्यजीव अभ्यासकांना या दुनियेत डोकावण्याची व तिची जवळून झलक घेण्याची संधी मिळते. म्हणून या गणनेला वन्यजीव संरक्षण कार्यक्रमात विशेष महत्त्व आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.